संजय बर्वे यांना महासंचालकपदी बढती
By admin | Published: March 15, 2017 04:07 AM2017-03-15T04:07:02+5:302017-03-15T04:07:02+5:30
गृह विभागाने राज्य गुप्त वार्ता विभागाचे आयुुक्त संजय बर्वे यांना महासंचालकपदी बढती दिली आहे. गेल्या आठ महिन्यांपासून रिक्त असलेले लाचलुचपत प्रतिबंधक विभागा
जमीर काझी, मुंबई
गृह विभागाने राज्य गुप्त वार्ता विभागाचे आयुुक्त संजय बर्वे यांना महासंचालकपदी बढती दिली आहे. गेल्या आठ महिन्यांपासून रिक्त असलेले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) महासंचालक पद तसेच ठेवत राज्य सुरक्षा महामंडळाच्या महासंचालकपदी बर्वे यांची बदली केली आहे.
होमगार्डचे उपमहासमादेशक संजय पांडे यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशामुळे एसीबीची पोस्ट रिक्त ठेवून ‘सिक्युरिटी कार्पोरेशन’चे पद तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नत करण्यात आले आहे, असे गृह विभागातील उच्चपदस्थ सूत्रांकडून सांगण्यात आले. मंगळवारी रात्री उशीरा त्याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत. गुप्त वार्ता विभागाचा अतिरिक्त पदभारही बर्वे यांच्याकडेच राहणार आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया हे सेवाज्येष्ठ असूनही तब्बल सव्वा वर्षे ‘होमगार्ड’मध्ये राहून निवृत्त व्हावे लागले. त्यांना डावलून ‘एसीबी’च्या प्रमुखपदी अन्य दुसऱ्या अधिकाऱ्यांची वर्णी लावता येणे शक्य नसल्यामुळे हे पद रिक्त ठेवून अप्पर महासंचालक विवेक फणसाळकर यांच्याकडे तात्पुरता कार्यभार सोपविण्यात आला आहे. मारिया हे सेवानिवृत्त झाल्यानंतर महासंचालकाच्या मंजूर सहा पदांपैकी दोन पदे रिक्त झाली होती. त्यापैकी सेवाज्येष्ठतेनुसार १९८६च्या आयपीएस बॅॅचचे अधिकारी एस. पी. यादव यांना चार फेबु्रवारीला विधी व तंत्र विभागाच्या महासंचालकपदी पदोन्नती देण्यात आली. मात्र त्यानंतर त्यांच्याच बॅचच्या संजय पांडे यांची गेल्यावर्षी २९ आॅक्टोंबरला गृह विभागाने विशेष अध्यादेश काढून ९ वर्षांपूर्वी तत्कालिन सरकारने मंजूर केलेला दोन वर्षे आठ महिन्यांचा कालावधी अकार्य दिन (डायस नॉन) केला. त्यामुळे पांडे यांनी आपल्याला जाणीवपूर्वक डावलण्यात आल्याचा आक्षेप घेत उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर राज्य सरकारला याप्रकरणाचा निकाल लागेपर्यंत महासंचालक दर्जाचे एक पद रिक्त ठेवण्याचे प्रतिज्ञापत्र सादर करावे लागले. त्यामुुळे मंजूर सहापैकी एसीबीचे पद रिक्त असल्याने सरकारने मंगळवारी सुरक्षा महामंडळांच्या प्रमुखपदाची पुन्हा एकदा तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती करत बर्वे यांची त्यापदावर नियुक्ती केली.