...तर संजय दत्तला पुन्हा बेलाशक तुरुंगात पाठवा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 04:56 AM2017-07-28T04:56:01+5:302017-07-28T04:56:09+5:30
अभिनेता संजय दत्त याने पॅरॉल, फर्लो आणि रेमिशन अशा सर्व सवलतींसह शिक्षा भोगून पूर्ण केली आहे याची पूर्ण खात्री करून घेतल्यानंतरच त्याला तुरुंगातून सोडण्यात आले आहे.
विशेष प्रतिनिधी ।
मुंबई: अभिनेता संजय दत्त याने पॅरॉल, फर्लो आणि रेमिशन अशा सर्व सवलतींसह शिक्षा भोगून पूर्ण केली आहे याची पूर्ण खात्री करून घेतल्यानंतरच त्याला तुरुंगातून सोडण्यात आले आहे. त्याला ठरलेल्या शिक्षेहून एकही दिवस आधी मुक्त केले गेलेले नाही. तरीही आम्ही लावलेले नियम व भोगलेल्या शिक्षेचा केलेला हिशेब चुकीचा आहे असे वाटत असेल तर संजय दत्तला जरूर पुन्हा तुरुंगात पाठवा. आमची त्यास मुळीच हरकत नाही, अशी ठाम भूमिका राज्य सरकारने गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात मांडली.
संजय दत्तला झुकते माप देत सरकारने नियमबाह्य पद्धतीने मुदतीआधीच सोडले, असा आरोप करणाºया जनहित याचिकेवर न्या. राजेंद्र सावंत व न्या. साधना जाधव यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. सरकारने आपले म्हणणे मांडणारे प्रतिज्ञापत्र याआधीच केले आहे. त्या अनुषंगाने युक्तिवाद करताना अॅडव्होकेट जनरल आशुतोष कुंभकोणी यांनी वरीलप्रमाणे भूमिका मांडली. याआधी सरकारला धारेवर धरणारे न्यायमूर्ती हे ऐकून काहीसे अचंबित झाले व त्यांनी, संजय दत्तला पुन्हा तुरुंगात पाठवायला हवे, असे आमचे म्हणणे नाही. नियमांचे नीट पालन झाल्याची खात्री करून घेणे हे आमचे काम आहे.
संजय दत्तला फर्लो, पॅरॉल आणि रेमिशन या प्रकारे किती व कशा सवलती दिल्या गेल्या, त्याचा हिशेब कसा केला गेला आणि ते करताना कोणकोणते नियम लावले गेले याचा सविस्तर तपशिल देणारा तक्ता अॅडव्होकेट जनरलनी सादर केला.
संजूबाबाचे लागोपाठ दोन अर्ज
संजय दत्तच्या सुट्टीसाठीचे दोन्ही अर्ज मंजूर करण्यात आले. सामान्य कैद्यांच्या बाबतीत अशीच तत्परता दाखवतात का, असा न्यायमूर्तींचा प्रश्न होता. यावर त्यांनी सरकारला अधिक खुलासा करण्यास सांगितले.
कुंभकोणी म्हणाले की, सरकार कैद्याला नियमांहून एक दिवसही आधी सोडू शकत नाही तसेच शिक्षा भोगून पूर्ण झाल्यावर एकही जास्त दिवस तुरुंगात ठेवू शकत नाही. संजय दत्तसारख्या ‘हाय प्रोफाईल’ कैद्याच्या बाबतीत या दोन्ही बाबींची खात्री करून मगच त्याला सोडले.त्यामुळे सुटकेआधी संजय दत्तला काही रात्री जशी झोप आली नसेल तसेच सुटकेची जबाबदारी असलेल्या तुरुंग अधिकाºयांनीी घेतलेला निर्णय योग्य असल्याची पक्की खात्री करण्यासाठी अनेक रात्री जागविल्या, यावरही त्यांनी भर दिला.