संजय दत्त कारागृहात परतलाच नाही!
By admin | Published: January 9, 2015 12:42 AM2015-01-09T00:42:58+5:302015-01-09T02:41:56+5:30
चौदा दिवसांची फर्लो घेऊन सुट्टीवर गेलेला अभिनेता संजय दत्त सुट्टीची मुदत संपल्यानंतरही कारागृहातमध्ये हजर झालेला नव्हता. वास्तविक त्याने गुरुवारी कारागृहात हजर होणे अपेक्षित होते.
पुणे : चौदा दिवसांची फर्लो घेऊन सुट्टीवर गेलेला अभिनेता संजय दत्त सुट्टीची मुदत संपल्यानंतरही कारागृहातमध्ये हजर झालेला नव्हता. वास्तविक त्याने गुरुवारी कारागृहात हजर होणे अपेक्षित होते. गुरुवारपर्यंत तरी कारागृह प्रशासनाला त्याची रजा वाढवल्याचा आदेश प्राप्त झालेला नव्हता अशी माहिती अधीक्षक योगेश देसाई यांनी दिली.
देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणत्याही कैद्याला २८ दिवसांची रजा मिळू शकते. त्याचा तो अधिकार आहे. चौदा दिवसांची ही रजा २८ दिवसांपर्यंत वाढवता येते. संजय दत्तने वाढीव रजेसाठी अर्ज दिलेला असल्यामुळे त्याची परवानगी केव्हाही येऊ शकते. जर या कालावधीत कैदी हजर झाला नाही तर संबंधित पोलीस ठाण्याला पत्र पाठवून अटक करून हजर करण्याच्या सूचना देण्यात येतात. त्यामुळे संजय दत्तवर तातडीने कारवाई करण्यात येऊ शकत नाही. या कालावधीत हजर न झाल्यास २९व्या दिवशी लगेच कारवाई करण्यात येते. त्यामुळे संजय दत्त कारागृहात हजर होतो की त्याने दिलेला वाढीव रजेचा अर्ज मान्य होतो हे शुक्रवारी स्पष्ट होणार आहे. (प्रतिनिधी)
अर्ज प्रलंबित असल्याने संजय पुन्हा मुंबईला परतला
रजेचा अर्ज प्रलंबित असल्याचे कारण देऊन तो पुन्हा मुंबईला परतल्याचे संजय दत्तच्या वकीलांनी सांगितले. संजय दत्तने आज पुण्यात पोहोचल्यावरही शहरातच वेळ घालविला. त्याचे वकील रिजवान मर्जंट यांच्या दाव्यानुसार, संचित रजा संपण्याआधीच संजयने वाढीव सुट्टीचा अर्ज केला होता. त्यावर अद्याप निर्णय व्हायचा आहे. त्यामुळे तो तुरुंगात राहू शकतो.