संजय दत्तप्रमाणे शिक्षेत सवलत हवी

By Admin | Published: January 17, 2016 02:56 AM2016-01-17T02:56:53+5:302016-01-17T02:56:53+5:30

१९९३च्या साखळी बॉम्बस्फोटांपूर्वी बॉलीवूड अभिनेता संजय दत्त याला त्याच्या राहत्या घरी शस्त्रे पोहोचविणाऱ्या इब्राहिम मूसा चौहान उर्फ बाबा चौहान याने संजय दत्तप्रमाणे

Sanjay Dutt needs a concession in the sentence | संजय दत्तप्रमाणे शिक्षेत सवलत हवी

संजय दत्तप्रमाणे शिक्षेत सवलत हवी

googlenewsNext

मुंबई : १९९३च्या साखळी बॉम्बस्फोटांपूर्वी बॉलीवूड अभिनेता संजय दत्त याला त्याच्या राहत्या घरी शस्त्रे पोहोचविणाऱ्या इब्राहिम मूसा चौहान उर्फ बाबा चौहान याने संजय दत्तप्रमाणे आपल्यालाही शिक्षेत सवलत द्यावी, अशी मागणी याचिकेद्वारे उच्च न्यायालयात केली आहे. त्याला आधी शिक्षेत सवलत देण्यात आली होती. मात्र तुरुंगाधिकाऱ्यांनी ती रद्द केली.
बाबा चौहान याला १९९३ बॉम्बस्फोटाप्रकरणी १० वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. मात्र त्याच्या चांगल्या वर्तणुकीमुळे आणि त्याचे काम पाहता कारागृह प्रशासनाने त्याला शिक्षेत सवलत दिली. नोव्हेंबरमध्ये त्याला पॅरोलवर सोडण्यातही आले. काही दिवसांपूर्वीच ही सवलत तुरुंग महाअधिक्षकांनी रद्द केली. त्यामुळे चौहानने उच्च न्यायालयात धाव घेतली.
तुरुंग महाअधीक्षकांनी सारासार विचार न करता ही सवलत रद्द केली आहे. बॉम्बस्फोट प्रकरणात दोषी असल्याने अशी वर्तणूक मिळत असल्याची तक्रार चौहान याने याचिकेत केली आहे.
चौहान याला कारागृहात बागकाम, शौचालय आणि नाशिक तुरुंगातील पाण्याची टाकी स्वच्छ करण्याचे काम देण्यात आले आहे. काम नीट केल्याने व चांगल्या वर्तणुकीमुळे चौहान याला कारागृह प्रशासनाने शिक्षेत ८० दिवसांची सूट दिली. त्यामुळे त्याची पेरॉलवर सुटका करण्यात आली.
२४ नोव्हेंबर रोजी कारागृहात परत आल्यानंतर त्याला ८० दिवसांची दिलेली विशेष सवलत रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले. एका कैद्याने चौहान काम नीट करत नसल्याची तक्रार केल्याने ही सवलत रद्द करण्यात आली, असे याचिकेत म्हटले आहे.
सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, चौहान आणि अबू सालेम यांनी १५ जानेवारी १९९३ रोजी संजय दत्तची त्याच्या राहत्या घरी भेट घेतली. भेटीच्या दुसऱ्या दिवशी शस्त्रे पाठवून देऊ, असे चौहान याने संजयला सांगितले. त्यानुसार शस्त्रे संजय दत्तच्या घरी पाठविण्यात आली आणि ती दुसरीकडे हलवण्यात आली. केवळ एके-४७ त्याच्या घरात आढळली. त्याच आरोपांतर्गत दत्तला ५ वर्षांची शिक्षा झाली. (प्रतिनिधी)

- संजय दत्तप्रमाणेच कारागृहात माझे वर्तन चांगले आहे. त्यामुळे संजय दत्तला ज्या आधारावर शिक्षेमध्ये सवलत देण्यात आली आहे, त्याच आधारावर मलाही शिक्षेत सवलत देण्यात यावी, अशी मागणी चौहान याने याचिकेत केली आहे. या याचिकेवरील सुनावणी २२ जानेवारी रोजी हंगामी मुख्य न्या. व्ही.के. ताहिलरमाणी यांच्या खंडपीठापुढे ठेवण्यात आली आहे.

Web Title: Sanjay Dutt needs a concession in the sentence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.