संजय दत्त घरी परतला
By Admin | Published: February 26, 2016 04:42 AM2016-02-26T04:42:24+5:302016-02-26T04:42:24+5:30
बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात झालेली पाच वर्षांची शिक्षा भोगून अभिनेता संजय दत्त आज सकाळी येरवडा तुरुंगातून मुक्त झाला. गुरुवारी सकाळी पत्नी
मुंबई/पुणे : बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात झालेली पाच वर्षांची शिक्षा भोगून अभिनेता संजय दत्त आज सकाळी येरवडा तुरुंगातून मुक्त झाला. गुरुवारी सकाळी पत्नी मान्यतासह चार्टड विमानाने तो मुंबईत दाखल झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्याने, ‘मी दहशतवादी नाही, शस्त्रात्र कायद्याखाली मला शिक्षा झाली होती, त्यामुळे मला मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी म्हणू नका,’ असे आवाहन केले.
मुन्नाभाई तुरुंगाबाहेर येणार असल्याने, त्याला पाहण्यासाठी चाहत्यांनी येरवडा तुरुंगाबाहेर मोठी गर्दी केली होती. त्याची पत्नी मान्यता दिग्दर्शक राजकुमार हिराणी, पटकथा लेखक अभिराम जोशी यांच्यासह त्याचे मित्र त्याच्या स्वागतासाठी वाट पाहत होते. सकाळी साडेआठला करागृहाचा दिंडी दरवाजा उघडला आणि पोलीस अधिकाऱ्यांपाठोपाठ कपाळावर भगवा टिळा... निळा शर्ट... निळी जिन्स... पाठीवर बॅग... हातात फाइल घेतलेला मुन्नाभाई तुरुंगाबाहेर आला. क्षणभर थांबत त्याने वाकून जमिनीला स्पर्श करीत तुरुंगाच्या इमारतीला ‘सॅल्यूट’ केला.