"त्यांनी मुख्यमंत्र्यांची सभा सुद्धा रद्द केली"; संजय गायकवाडांच्या आरोपांना केंद्रीय मंत्री जाधवांचं प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2024 11:25 AM2024-12-02T11:25:00+5:302024-12-02T11:26:37+5:30

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर आला आहे. बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रताप जाधव यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 

Sanjay Gaikwad also canceled Eknath Shinde's meeting; Reply by Union Minister Pratap Jadhav | "त्यांनी मुख्यमंत्र्यांची सभा सुद्धा रद्द केली"; संजय गायकवाडांच्या आरोपांना केंद्रीय मंत्री जाधवांचं प्रत्युत्तर

"त्यांनी मुख्यमंत्र्यांची सभा सुद्धा रद्द केली"; संजय गायकवाडांच्या आरोपांना केंद्रीय मंत्री जाधवांचं प्रत्युत्तर

'प्रताप जाधव यांनी मिलिंद नार्वेकर यांना कॉल करून जयश्री शेळकेंना उमेदवारी मिळवून दिली', असा गंभीर आरोप आमदार संजय गायकवाड यांनी केला. गायकवाड यांचे आरोप केंद्रीय मंत्री प्रताप जाधव यांनी फेटाळून लावले आहेत. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा सुद्धा रद्द केली होती, असे सांगत जाधव यांनी सविस्तर भाष्य केले. 

संजय गायकवाड यांच्या आरोपांवर प्रताप जाधव काय बोलले?

माध्यमांशी बोलताना प्रताप जाधव म्हणाले की, "खरं म्हणजे आमचा उमेदवार इतका सक्षम होता की, त्यांना कुणीच काय, मुख्यमंत्र्यांची सभा सुद्धा त्यांनी स्वतःहून रद्द केली. मोठ्या मताधिक्याने जिंकून येण्याचा त्यांना पूर्ण विश्वास होता. मते कमी पडली, त्यामुळे कदाचित त्यांना तसं वाटत असेल. त्यांनी जे काही आरोप केले, त्याला मी उत्तर देणार नाही. पण, बुलढाणा मतदारसंघ असेल, बुलढाणा जिल्हा असेल, इथली जनता सुज्ञ आहे. कोणी काय केले, हे लोकांना माहिती आहे."  

मिलिंद नार्वेकर यांना सांगून जयश्री शेळके यांना उमेदवारी मिळून दिली, असा आरोप संजय गायकवाड यांनी केला. त्याला उत्तर देताना जाधव म्हणाले, "उद्या राहुल गांधींना फोन करून बुलढाण्याची जागा काँग्रेसऐवजी उबाठाला सोडा, असा आरोप काँग्रेसवाले माझ्यावर करतील. आरोप कोणीही करू शकतं. आरोपात किती तथ्य आहे, हे जनतेला समजत असतं", असं उत्तर प्रताप जाधवांनी आमदार संजय गायकवाड यांना दिले.  

संजय गायकवाड काय म्हणाले?

"ठाकरेंच्या शिवसेनेकडून रविकांत तुपकर यांचा एबी फॉर्म तयार होता. अचानक आमच्या खासदारांचा मिलिंद नार्वेकरांना फोन जातो. मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरेंशी बोलतात आणि तो एबी फॉर्म थांबवला जातो. नंतर संजय कुटे अनिल परबांना कॉल करतात आणि दोघेही (नार्वेकर-परब) मातोश्रीवर पोहोचतात. दोघेही सांगतात की, उमेदवार बदलून द्या. मला हेच सांगायचं आहे की, आमच्या खासदारांनी किंवा आमच्या संपर्कप्रमुखांनी असं का वागावं?", असा सवाल करत आमदार संजय गायकवाड यांनी गंभीर आरोप केले.  

संजय कुटेंच्या घरी जयश्री यांची बैठक झाली. माझ्याकडे सगळी माहिती आहे. योगेंद्र गोडेंना काम करू नका म्हणून सांगितलं. भाजपचा एकही कार्यकर्ता आमच्या गाडीत कुठे फिरला नाही. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ९९ टक्के लोक आमच्याविरोधात काम करत होते", असा आरोप संजय गायकवाड यांनी केला. 

Web Title: Sanjay Gaikwad also canceled Eknath Shinde's meeting; Reply by Union Minister Pratap Jadhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.