बारामती, अमरावती थोपत नाही तोच, बुलढाणा; संजय गायकवाडांची बंडखोरी, दोन अर्ज भरले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 02:48 PM2024-03-28T14:48:01+5:302024-03-28T14:48:44+5:30
Sanjay Gaikwad Buldhana Nomination news: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा ताप वाढला आहे. महायुतीमध्ये बंडाचे निशान शिवसेनेनेच आधी रोवल्याने वातावरणही तापण्याची चिन्हे आहेत.
बारामतीमध्ये विजय शिवतारे, अमरावतीमध्ये आनंदराव अडसूळ, बच्चू कडूंनी महायुतीच्या उमेदवारांविरोधात दंड थोपटलेले असताना बुलढाण्यात थेट बंडखोरीच करण्यात आली आहे. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा ताप वाढला आहे. महायुतीमध्ये बंडाचे निशान शिवसेनेनेच आधी रोवल्याने वातावरणही तापण्याची चिन्हे आहेत.
शिवतारे, अडसूळ यांच्या भेटी घेऊन शिंदे, फडणवीस यांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला आहे. अद्याप या दोघांनीही माघार घेतलेली नाहीय. तोच बुलढाण्यामध्ये शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
शिंदे गटाची अद्याप लोकसभेची यादी आलेली नाही. तरीही गायकवाडांनी अर्ज भरल्याने आता पुढे काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या जागेवरून प्रतापराव जाधव हे शिवसेनेचे खासदार आहेत. यामुळे जाधवांचे तिकीट कापले जाणार की गायकवाडांना बंडखोर घोषित केले जाणार, याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत. या बंडखोरीमुळे शिवसेनेतच वर्चस्ववाद सुरु असल्याचे समोर आले आहे.
गायकवाड हे राज्यात मंत्रिपदाच्या शर्यतीत होते. परंतु त्यांना गेली दीड वर्षे झुलवत ठेवण्यात आले होते. यातच भाजपा निगेटीव्ह रिपोर्टची भीती दाखवत शिवसेनेच्या जागांवर उमेदवारांना डावलत असल्याची भावना शिवसेनेच्या आमदार, नेत्यांमध्ये आहे. यामुळे गायकवाड यांच्या या खेळीमुळे खुद्द शिंदेच अडचणीत येण्याची शक्यता आहे.
आज दुपारी २ वाजता गायकवाड यांनी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी, भाजपाचे नेते हजर नव्हते. शिंदे गटाचे तेथील स्थानिक नेते हजर होते. यामुळे गायकवाडांच्या बंडखोरीवर शिंदे काय कारवाई करतात, याकडेही राज्याचे लक्ष लागले आहे. गायकवाड यांनी दोन अर्ज भरल्याचे समजते आहे.