संजय गांधी निराधार अनुदान बायोमेट्रिक
By Admin | Published: April 2, 2015 03:04 AM2015-04-02T03:04:32+5:302015-04-02T03:04:32+5:30
संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावण बाळ योजना संपूर्णपणे बायोमेट्रिक पद्धतीने राबविण्याचा शासनाचा मानस असून,
मुंबई : संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावण बाळ योजना संपूर्णपणे बायोमेट्रिक पद्धतीने राबविण्याचा शासनाचा मानस असून, येत्या ६ महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच या योजनेमधील लाभार्थ्यांना आॅनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे सामाजिक न्याय व विशेष साहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी बुधवारी विधानसभेत सांगितले.
संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या भत्त्यात वाढ करण्याबाबतचा प्रश्न सदस्य योगेश सागर यांनी उपस्थित केला होता. संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांच्या उत्पन्नाची मर्यादा वाढविण्याबाबत शासन सकारात्मक आहे, असेही बडोले यांनी यावेळी सांगितले.
राज्यमंत्री दिलीप कांबळे म्हणाले, संजय गांधी निराधार अनुदान योजना ही राज्य शासनाची आहे. केंद्र सरकारची या योजनेतील वयोमयार्दा ६० वर्ष असून राज्यामध्ये ही ६५ वर्ष आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनेतील वयोमर्यादेत तफावत असून ही समांतर करण्यासंदर्भात मंत्रिमंडळात चर्चा करून एका महिन्यात निर्णय घेण्यात येईल. तसेच या योजनेतील निराधार विधवा, ६० वर्षांवरील निराधार व्यक्ती, रोग पीडित व्यक्ती, अपंग, एक मूल असलेल्या निराधार महिला, निराधारांना योजनेंतर्गत उदरनिवार्हासाठी दिले जाणारे मासिक अर्थसाहाय्य, मानधन अथवा उदरनिर्वाह भत्त्यामध्ये वाढ करण्याबाबत निश्चित कालावधीत निर्णय घेण्यात येणार आहे, असे कांबळे यांनी या वेळी सांगितले.
राज्यमंत्री म्हणाले, त्यांनी या वेळी सांगितले. सदस्य दिलीप वळसे-पाटील, जयंत पाटील, भास्कर जाधव, अब्दुल सत्तार, विजय औटी, बबनराव शिंदे यांनी चर्चेत सहभाग घेतला होता. (विशेष प्रतिनिधी)