"संजय राऊतांच्या अंगात आलं अन् सरकार बनलं, पण..."; कदमांचं विधान, राऊतांनी दिलं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 11:07 AM2024-11-13T11:07:47+5:302024-11-13T11:08:47+5:30
Vishwajeet Kadam Sanjay Raut : विश्वजित कदम यांनी खासदार संजय राऊत यांच्याबद्दल मिश्कील विधान केलं.
Vishwajeet Kadam News: लोकसभा निवडणुकीत सांगलीच्या जागेवरून विश्वजित कदम आणि संजय राऊत यांच्यात राजकीय जुगलबंदी रंगली होती. दोन्ही नेत्यांनी एकमेकांना टार्गेट केले होते. त्यानंतर आता विश्वजित कदमांनी संजय राऊतांबद्दल मिश्कील विधान केलं. त्याला राऊतांनीही उत्तर दिले.
कडेगाव येथे विश्वजित कदम यांची प्रचारसभा झाली. या सभेत बोलताना विश्वजित कदम यांनी खासदार संजय राऊतांबद्दल एक विधान केले.
विश्वजित कदम काय बोलले?
"मी विनोदाने बऱ्याचदा म्हणतो की, संजय राऊतांच्या अंगात आलं म्हणून सरकार बनलं. पण, अडचण एवढी झाली की, अंगातलं कधी उतरलंच नाही म्हणून सरकार गेलं. सरकार बनलं. सोनिया गांधी, राहुल गांधींच्या आशीर्वादाने राज्यमंत्री बनलो. सहा खाती मिळाली. कामाला लागलो. दुर्दैवाने करोनाचा प्रार्दुभाव झाला", असे विश्वजित कदम म्हणाले.
संजय राऊत काय म्हणाले?
विश्वजित कदम यांच्या मिश्कील विधानावर बोलताना संजय राऊत म्हणाले, "त्यांनी अजित पवारांचं विधान ऐकलं नाही वाटतं. त्यांना काय म्हणायचं, ते गोंधळलेल्या मनस्थितीत असावेत. अजित पवार यांनी एक मुलाखत काल दिली आणि त्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं आहे. सरकार पाडण्यासंदर्भात जी बैठक झाली. त्या बैठकीला अदाणी हजर होते", अशी प्रतिक्रिया राऊतांनी दिली.