“मी पक्ष सोडला की काय फरक पडतो, ते कळेल”; बड्या नेत्याचा ठाकरे गटालाच इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 11:17 IST2025-03-13T11:13:16+5:302025-03-13T11:17:19+5:30
Thackeray Group Sanjay Kadam News: गीतेंनी स्वतःची निवडणूक उरकून घेतल्यानंतर पुढील निवडणुकीत या भागातील मतदारसंघात फिरकेलही नाहीत. प्रचार केला नाही, असा आरोप करण्यात आला आहे.

“मी पक्ष सोडला की काय फरक पडतो, ते कळेल”; बड्या नेत्याचा ठाकरे गटालाच इशारा
Thackeray Group Sanjay Kadam News: गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे गटाला लागलेली गळती थांबता थांबत नसल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यभरातून अनेक आजी-माजी नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते प्रचंड प्रमाणात ठाकरे गटाला रामराम करत शिवसेना शिंदे गटात सामील होत आहे. अलीकडेच कोकणातही ठाकरे गटाला मोठे धक्के बसले. आता पुन्हा एकदा कोकणातील नेत्यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली. तसेच आपल्याच पक्षाला इशारा देत ठाकरे गट सोडण्याबाबत सूचक विधान केले आहे.
अलीकडेच झालेल्या राजकीय घडामोडींनंतर खेड, दापोली, मंडणगड मतदारसंघात मला अनेक पक्षातून निमंत्रणे येत आहेत. माझ्यासारखे नेतृत्व त्यांच्या पक्षात असावे, यासाठी अनेक नेते प्रयत्न करत आहेत. शिवसेना शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनीही म्हटले आहे की, माझा जुना सहकारी माझ्यासोबत पुन्हा आला, तर पायघड्या घालून त्याचे स्वागत करेन. पूर्वी झालेल्या वादातून मतभेद होत असतात. परंतु, त्यानंतर चांगला कार्यकर्ता, चांगला नेता आपल्यासोबत असावा, या भावनेतून रामदास कदम यांनी केलेल्या विधानाचे स्वागत करतो. माझ्यासोबत पंचायत समिती, जिल्हा परिषद सभापती, सदस्य आहेत. पदाधिकारी आहेत. या सर्वांसोबत बसून निर्णय घेणार आहे, असे सूचक विधान ठाकरे गटाचे नेते संजय कदम यांनी केले.
मी पक्ष सोडला की काय फरक पडतो, ते कळेल
गेल्या ५ ते ६ दिवसांपासून मी आणि माझे कुटुंबीय आम्ही तिरुपतीला गेलो होतो. परंतु, याच दिवसांत काही घडामोडी घडल्या आणि माझ्या पक्षबदलाच्या संदर्भात बातम्या येऊ लागल्या. मात्र, यानंतर आमच्यात पक्षातील काही लोकांनी पुढाकार घेतला असून, वेगवेगळ्या पद्धतीने माझ्यावर टीका केली जात आहे. मी त्यांच्यावर अद्याप तरी काही बोललो नाही. परंतु, आता जे लोक टीका करत आहेत, त्यांनी माझ्या विधानसभा निवडणुकीवेळी कामच केले नाही. उलट विरोधातच काम केले. माझ्याशी संबंधित गोष्टींची चौकशी लावण्यापर्यंत मजल गेली. मी या लोकांच्या विरोधात कधी काही केले नाही. मला आता अडचणीत आणण्याचे काम आमच्याच पक्षातील लोकांनी करून तेच कसे शिवसैनिक आहेत, अशा बतावण्या करण्याचे काम सुरू केले आहे. मी पक्ष सोडला की काय फरक पडतो, ते कळेल. काळच त्याचे उत्तर देईल, असे सांगत संजय कदम यांनी ठाकरे गटालाच इशारा दिला.
दरम्यान, माझा स्वभाव सगळ्यांना माहिती आहे. अनंत गीते यांनी त्यांची निवडणूक उरकून घेतली. मात्र, त्यानंतर महाड आणि या भागातील पुढच्या निवडणुकांसाठी एकही दिवस प्रचार केला नाही. आता राष्ट्रीय नेते म्हणून पत्रकार परिषदा घेत आहेत. पक्ष नेतृत्वाने यात लक्ष घातले पाहिजे, अशी अपेक्षा संजय कदम यांनी व्यक्त केली.