मासुर्डीच्या व्यथा वाचून धावून आले खासदार संजय काकडे !
By admin | Published: March 26, 2016 12:29 AM2016-03-26T00:29:31+5:302016-03-26T00:29:31+5:30
घागरभर पाण्यासाठी चिंताग्रस्त असलेल्या मासुर्डी गावाची कहाणी ‘लोकमत’ने प्रकाशित करताच, खासदार संजय काकडे यांनी या ग्रामस्थांच्या दु:खावर फुंकर घालताना मासुर्डी हे गाव
औसा (जि. लातूर) : घागरभर पाण्यासाठी चिंताग्रस्त असलेल्या मासुर्डी गावाची कहाणी ‘लोकमत’ने प्रकाशित करताच, खासदार संजय काकडे यांनी या ग्रामस्थांच्या दु:खावर फुंकर घालताना मासुर्डी हे गाव दत्तक घेत असल्याची घोषणा केली़ ‘लोकमत’मुळेच गावची समस्या समजली असून, आता गावाला महाराष्ट्रातील एक आदर्श व मॉडेल गाव बनवू या, अशी हाक देत गावातील विविध विकासकामांसाठी ५० लाख रुपये देण्याची घोषणाही केली़
औसा तालुक्यातील मासुर्डी हे अडीच हजार लोकसंख्येचे गाव़ आॅक्टोबर २०१४पासून येथे भीषण पाणीटंचाई आहे़ लोकमत चमूने २४ तास गावात राहून ‘आॅन द स्पॉट रिपोर्ट’द्वारे तेथील पाण्याचे दुर्भिक्ष सर्वांसमोर आणले़ हे सर्व वृत्तांकन राज्यसभा सदस्य संजय काकडे यांनी वाचले व ते अस्वस्थ झाले. त्यांनी आपण हे गाव दत्तक घेऊन, या गावाला आदर्श गाव बनविण्याचा संकल्प केला. गुरुवारी मासुर्डीला येऊन त्यांनी तशी घोषणाही केली. त्यांच्यासमवेत माजी आमदार पाशा पटेल, आमदार बच्चू कडू व अन्य राजकीय नेते व प्रशासकीय अधिकारी होते. खा. काकडे यांनी गावातील टंचाईस्थितीची पाहणी केली. गावकऱ्यांशी संवाद साधला. मासुर्डी गावची परिस्थिती पाहून त्यांचे मन सुन्न झाले.
मासुर्डीला आदर्श मॉडेल बनविणार : खा. काकडे
आतापर्यंत औसा तालुक्यातील ३७ गावांना ९ कोटी ६६ लाख रुपयांचा निधी जलसंधारणाच्या कामांसाठी दिला आहे़ आता हे ३८वे गाव आहे़ हे गावच दत्तक घेतल्यामुळे या गावात सर्व कामे करून महाराष्ट्रात आदर्श ठरेल असे ‘मॉडेल गाव’ उभा केले जाईल. हा ‘पायलट प्रोजेक्ट’ म्हणून राज्याने पाहावा, असे खा. काकडे म्हणाले.
‘लोकमत’वर कौतुकाचा वर्षाव... : प्रत्येक मान्यवराने आपल्या भाषणात ‘लोकमत’मधील वृत्तांकनाचा आवर्जून उल्लेख केला़ लातूर आणि उस्मानाबाद या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या या गावचे भीषण संकट राज्याच्या समोर आणल्याने आम्हाला गावच्या परिस्थितीची माहिती मिळाली, असे सांगून खा. संजय काकडे यांनी ‘लोकमत’चे कौतुक केले़