पुन्हा राज्यभेसाठी संजय काकडेंना प्रतीक्षा भाजपच्या सहयोगाची !
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 10:37 AM2020-03-12T10:37:23+5:302020-03-12T10:37:51+5:30
राज्यसभेच्या तिसऱ्या जागेसाठी भाजपकडून अनेक नावे चर्चेत आहेत. यामध्ये माजीमंत्री हंसराज आहिर, पक्षाचे उपाध्यक्ष शाम जाजू आणि महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या नावांचा समावेश आहे.
नवी दिल्ली - राज्यसभेसाठी भाजपकडून उदयनराजे भोसले आणि केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांचे नाव निश्चित केले आहे. मात्र तिसरी जागा अद्याप निश्चित झालेली नाही. या जागेसाठी खडसेंच्या नावाची चर्चा होती. मात्र ती चर्चाही मागे पडली आहे. आता भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांना पुन्हा एकदा राज्यसभेवर जाण्यासाठी भाजपच्या सहयोगाची प्रतीक्षा आहे.
राज्यसभेसाठी उदयनराजे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली असताना उदयनराजे यांचे पक्षात काय योगदान आहे असे विचारत काकडे यांनी त्यांच्या नावावर आक्षेप नोंदवला होता. तसेच उदयनराजे पक्षात आले आणि पडले. त्यांना त्यांचा भाऊ वगळता इतर आमदारही निवडून आणता आले नाही असा टोलाही काकडे यांनी लगावला आहे. मात्र आता भाजपने उदयनराजे यांच्याच नावावर शिक्कामोर्तब केले आहे.
2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर संजय काकडे भाजपसोबत गेले होते. त्यामुळे त्यांना भाजपचे सहयोगी खासदार म्हणून ओळखण्यात येत होते. मात्र दुसऱ्यांदा राज्यसभेवर जाण्यासाठी त्यांना भाजपच्या सहयोगाची अपेक्षा आहे. तिसरे तिकीट आपल्यालाच मिळेल असा दावा त्यांनी केला आहे. मात्र त्यावर अद्याप भाजपकडून निर्णय घेण्यात आलेला नाही. याआधी त्यांनी भाजपकडून पुणे लोकसभा मतदार संघातूनही उमेदवारी मागितली होती.
राज्यसभेच्या तिसऱ्या जागेसाठी भाजपकडून अनेक नावे चर्चेत आहेत. यामध्ये माजीमंत्री हंसराज आहिर, पक्षाचे उपाध्यक्ष शाम जाजू आणि महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या नावांचा समावेश आहे. मात्र पक्षासाठी आपण केलेल्या कामाची दखल घेऊन तिसरी उमेदवारी आपल्यालाच मिळेल, असं संजय काकडे यांना वाटते.