“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 05:31 PM2024-04-27T17:31:19+5:302024-04-27T17:31:40+5:30
Sanjay Nirupam News: काँग्रेसकडून इच्छुक उमेदवाराचा ठाकरे गटाने पत्ता कट केल्याचा दावा संजय निरुपम यांनी केला आहे.
Sanjay Nirupam News: लोकसभा निवडणूक ऐन रंगात आली असली तरी काँग्रेसमधील मानापमान आणि नाराजी नाट्य संपताना दिसत नाही. सांगलीच्या जागेवरून आधीच काँग्रेसमध्ये नाराजी असून, दुसरीकडे आता उत्तर मध्य मुंबईच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसपूस सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. काँग्रेस नेते नसीम खान यांनी प्रचारात उतरणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. यावरून संजय निरुपम यांनी महाराष्ट्र काँग्रेसबाबत मोठा दावा केला आहे.
उत्तर मध्य मुंबईतून काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली. यानंतर नसीम खान यांनी ४८ जागांपैकी एकाही जागेवर मुस्लिम समजाचा उमेदवार दिला नाही, याबाबत नाराजी व्यक्त करत प्रचारात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. तसेच पत्र काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना पाठवले. यानंतर वर्षा गायकवाड यांनी नसीम खान यांची भेट घेतली. या प्रकारावर संजय निरुपम यांनी एक्सवर एक पोस्ट करत मोठे विधान केले.
महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको
उत्तर मध्य मुंबईच्या जागेवर आपल्याला उमेदवारी मिळेल, या आशेवर एक नेता होता. त्यालाही पक्षाने नाराज केले. काँग्रेसच्या मुस्लिम मतांवर डोळा ठेवून असलेल्या ठाकरे गटाने या नेत्याचा पत्ता कट केल्याची चर्चा आहे. महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटासमोर पूर्णपणे नतमस्तक झाली आहे. ठाकरे गटाला शरण गेला आहे, असे मागेच म्हटले होते. आता उद्या जर महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको. महाराष्ट्रातील दीड कोटी मुस्लिम समाज काँग्रेसचा मतदार आहे. मात्र, संपूर्ण मुस्लिम समाज काँग्रेसवर नाराज आहे. तसेच मुस्लिम समाज काँग्रेसशी बंडखोरी करण्याच्या तयारीत आहे, असा दावा संजय निरुपम यांनी एक्सवरील पोस्टमध्ये केला आहे.
दरम्यान, प्रश्न वर्षा गायकवाड यांचा नाही. अल्पसंख्यांक समाजात उद्रेक आहे. म्हणून प्रचार समितीच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला. माझ्यावर समाजाचा दबाव खूप आहे. वर्षाताई गायकवाड माझ्या बहिणीसारखी आहे. पण, ही जी परिस्थिती निर्माण झाली आहे. अल्पसंख्यांक समाजाला कोणाच्या सांगण्यावरून दुर्लक्षित केले, ते पाहावे लागेल. वेळ आल्यावर पक्षश्रेष्ठींना सांगेन. राजीनाम्यावर ठाम आहे, अशी प्रतिक्रिया नसीन खान यांनी दिली.