संजय निरुपम यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार - सुधीर मुनगंटीवार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 02:56 PM2018-11-10T14:56:57+5:302018-11-10T15:05:27+5:30
काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी तस्करांसोबत जोडलेले माझे संबंध म्हणजे राजकीय हीनता आहे.
चंद्रपूर : काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी तस्करांसोबत जोडलेले माझे संबंध म्हणजे राजकीय हीनता आहे. इतक्या खालच्या स्तराला जाऊन तथ्यहीन आरोप मी आजवर राजकीय आयुष्यात बघितले नाही. सत्याचा निर्घृण खून निरुपम यांनी केला आहे. त्यामुळं त्यांच्यावर चंद्रपूर जिल्ह्यात अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार, अशी प्रतिक्रिया वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. अवनी वाघिणीच्या मृत्यूसंदर्भात निरुपम यांनी मुनगंटीवार यांच्यावर आज जे गंभीर आरोप केले, ते मुनगंटीवार यांनी फेटाळून लावले.
तत्पूर्वी संजय निरुपम यांनी सुधीर मुनगंटीवारांवर गंभीर आरोप केले होते. सुधीर मुनगंटीवार वनमंत्री झाल्यापासून वाघ मारण्याच्या संख्येत वाढ झाली आहे. अवनी वाघीण हत्या प्रकरणी मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळातून हटवून त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. याप्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी निरुपम यांनी केली आहे. शिवाय, मुनगंटीवार हे आंतरराष्ट्रीय शिकारी माफियासोबत आहेत, त्याच्यासोबत ते पैसे कमवत आहेत, असा गंभीर आरोपदेखील निरुपम यांनी केला होता.
राज्यात भाजपाचे सत्तेत येताच 2015 मध्ये 14 वाघांचा मृत्यू झाला. 2016 मध्ये 16 आणि 2017मध्ये तब्बल 21 वाघांचा मृत्यू झाला. यात काही वाघांचा नैसर्गिक मृत्यूही झाला असावा. पण वाघांना ठार मारल्याच्या घटना पाहता सुधीर मुनगंटीवार हे शिकार करणाऱ्या आंतरराष्ट्रीय माफियांच्या टोळीत सामील असावेत, असे विधान निरुपम यांनी केले आहे.
...म्हणून अवनी वाघिणीला केले ठार
टी-1 वाघिणीला पकडण्यासाठी गेल्या 47 दिवसांपासून वनविभागाचे प्रयत्न सुरू होते. अखेर 2 नोव्हेंबरच्या रात्री वन विभागाच्या रेस्क्यू टीमनं तिला ठार केलं. या वाघिणीनं गेल्या अनेक दिवसांपासून धुमाकूळ घातला होता. तिनं13 जणांचा जीव घेतला होता. अवनीच्या मृत्यूनंतर वन्यजीव प्रेमींनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. शुक्रवारी टी-1 वाघिणीचा शोध सुरू होता. त्यावेळी ती शोध पथकाला दिसली. तिला जेरबंद करण्यासाठी पथकाचे प्रयत्न सुरू होते. मात्र त्यावेळी तिनं पथकाच्या दिशेनं चाल केली. त्यामुळे शार्प शूटर अजगर अलीनं तिच्यावर गोळ्या झाडल्या. त्यात तिचा मृत्यू झाला.