"भाजपने तिसरा उमेदवार दिला तरी..."; संजय पवार, राऊत यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 04:15 PM2022-05-26T16:15:03+5:302022-05-26T16:16:41+5:30
Sanjay Raut and Sanjay Pawar : गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेदरम्यान महाविकास आघाडी सरकारमधील अनेक बडे नेते, खासदार उपस्थित होते. दुपारी 2 वाजताच्या दरम्यान संजय राऊत आणि संजय पवार यांनी विधानभवनात आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.
मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून संजय राऊत (Sanjay Raut) आणि संजय पवार (Sanjay Pawar) यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी भाजपाने तिसरा उमेदवार दिला तरी माझे लक सुरु आहे, महाविकास आघाडी सरकार या शिवसेनेच्या दोन्ही जागा निवडून आणेल, असे संजय पवार यांनी सांगितले. याचबरोबर,जो विश्वास पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दाखवलेला आहे, तो सार्थ ठरवेन. छत्रपती हे आमचे दैवत आहेत, मी संभाजीराजेंना भेटणार आहे. चर्चेत नाव असणे आणि नाव फायनल होणे यात खूप फरक आहे. मी पण मराठा आहे, समाजाच्या प्रत्येक आंदेलनात मी होतो, असे संजय पवार म्हणाले.
याचबरोबर, उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर संजय राऊत यांनीही माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शिवसेनेचे कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार आणि मी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरलेला आहे. भाजपने तिसरी जागा लढवली तरी फरक पडत नाही, त्यांनी कितीही प्रयत्न करू द्या, विजय आमचाच होणार, असा विश्वास व्यक्त करत संजय राऊत यांनी भाजपला फटकारले आहे. तसेच, शिवसेनेच्या उमेदवारांना संपूर्ण महाविकास आघाडीचा पाठिंबा आहे, त्यामुळे विजय निश्चित असल्याचे संजय राऊत म्हणाले.
गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेदरम्यान महाविकास आघाडी सरकारमधील अनेक बडे नेते, खासदार उपस्थित होते. दुपारी 2 वाजताच्या दरम्यान संजय राऊत आणि संजय पवार यांनी विधानभवनात आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ज्येष्ठ नेते शरद पवार, काँग्रेसचे नेते मंत्री बाळासाहेब थोरात तसेच सेनेचे सगळे मंत्री, महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित होते.
दरम्यान, राज्यातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी येत्या 10 जूनला निवडणूक होणार आहे. सध्या विविध पक्षीय बलानुसार भाजपचे दोन, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचा एक उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतो. तर उर्वरित एका जागेसाठी शिवसेनेने आपला दुसरा उमेदवार जाहीर केला आहे. सहाव्या जागेसाठी संभाजी छत्रपती देखील उत्सुक होते, मात्र त्यांना शिवसेनेने पुरस्कृत उमेदवारी ऐवजी पक्षात प्रवेश घेऊन अधिकृत उमेदवार व्हा, अशी ऑफर दिली होती. पण संभाजी छत्रपतींनी ही ऑफर नाकारली आहे. अखेर शिवसेनेने सहाव्या जागेसाठी कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना संधी दिली.