Sanjay Raut Arrested: संजय राऊत यांना ईडीकडून अटक; घरातून ११ लाख जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2022 06:51 AM2022-08-01T06:51:09+5:302022-08-01T06:52:39+5:30
रविवारच्या छापेमारीसाठी ईडीने एकूण तीन पथके तयार केली होती. त्यात २५ अधिकारी होते. दोन पथके राऊत यांच्या भांडूप येथील निवासस्थानी सकाळी सात वाजता पोहोचली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पत्राचाळ पुनर्विकासात झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत चांगलेच अडचणीत आले असून, रविवारी सकाळी ७ वाजता ईडीच्या अधिकाऱ्यांनी अचानक त्यांच्या भांडूप येथील घरी छापेमारी केली. त्यात ईडीच्या अधिकाऱ्यांना ११ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम सापडली. याचसोबत काही कागदपत्रे अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतली. ते चौकशीत सहकार्य करत नसल्याचे सांगत सायंकाळी पावणेसहाच्या दरम्यान राऊत यांना ईडीने बॅलॉर्ड इस्टेट येथील कार्यालयात चौकशीसाठी आणले. रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरु होती. यानंतर त्यांना मध्यरात्री अटक करण्यात आली.
Sanjay Raut Arrested: संजय राऊत ईडी चौकशीत सहकार्य करत नव्हते; आज PMLA कोर्टात करणार हजर
आपल्याकडे कोणतीही कागदपत्रे नाहीत. सर्व कागदपत्रे चार्टर्ड अकाउंटंटकडे आहेत तसेच ती कागदपत्रे मी प्राप्तिकर विभागालाही दिल्याची माहिती राऊत यांनी ईडीला दिल्याचे समजते. मात्र, अधिकाऱ्यांना झडतीत दुसरी काही कागदपत्रे सापडली आहेत. १९ जुलै आणि २७ जुलै असे दोनदा ते ईडीच्या चौकशीला अनुपस्थित राहिले होते. १,०३९ कोटी रुपयांच्या पत्राचाळ पुनर्विकास घोटाळ्यामध्ये राऊत यांचे निकटवर्तीय आणि गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे माजी संचालक प्रवीण राऊत यांना वैयक्तिक १०० कोटी रुपयांचा लाभ झाल्याची माहिती प्रवीण यांच्या चौकशीत पुढे आली होती. तसेच, यामध्ये संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबीयांनादेखील आर्थिक लाभ झाल्याची माहिती ईडीला मिळाली होती. याच पैशांचा वापर राऊत यांनी दादर येथील फ्लॅट आणि अलिबाग येथील किहीम येथे आठ भूखंडांची खरेदी केल्याचा ठपका ईडीने त्यांच्यावर ठेवला आहे.
महाराष्ट्र कमजोर होत आहे, पेढे वाटा
माझा कोणत्याही घोटाळ्याची संबंध नाही. मी झुकणार नाही, शिवसेना सोडणार नाही. मरेन, पण शरण जाणार नाही. खोटे आरोप, खोटी कागदपत्रे दाखवून कारवाई केली जात आहे; पण मी झुकणार नाही, शिवसेना सोडणार नाही. महाराष्ट्र आणि शिवसेना लढत राहील. महाराष्ट्र कमजोर होत आहे, पेढे वाटा. बेशरम आहात तुम्ही, तुम्हाला लाज वाटली पाहिजे.
- संजय राऊत, खासदार, शिवसेना
...हा तर गळा घोटण्याचा डाव
संजय राऊत यांच्यावरील कारवाई हा लोकशाहीचा, विरोधकांचा गळा घोटण्याचा प्रयत्न आहे. हे कारस्थान लज्जा सोडून आहे. जो हिंदूंचा, मराठी माणसाचा आणि शिवसेनेचा आवाज बुलंद करतोय, त्याचाच गळा घोटण्याचा डाव आहे. शेवटच्या क्षणापर्यंत या जुलूमशाहीविरोधात लढत राहू आणि महाराष्ट्राची माती काय असते, तिथला पराक्रम काय असतो, हे दाखवून देऊ.
- उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना
ईडीने सकाळी नव्याने राऊत यांना समन्स जारी केले. त्या समन्सच्या आधारे ईडीच्या अधिकाऱ्यांनी राऊत यांचा जबाब नोंदविला आहे. त्यांना ईडीकडून अटक करण्यात आलेली नाही आणि ताब्यातही घेण्यात आलेले नाही.
- विक्रांत साबणे, संजय राऊत यांचे वकील
असा मागे लागला ईडीचा ससेमिरा
पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीने सर्वप्रथम २८ जून रोजी राऊत यांना पहिले समन्स दिले होते. मात्र, त्यावेळी राज्यातील सत्तासंघर्ष शिगेला होता. त्यामुळे राऊत यांनी आपल्या वकिलामार्फत १४ दिवसांची मुदत देण्याची विनंती ईडीला केली होती. मात्र, ही विनंती फेटाळण्यात आली होती.
१ जुलै रोजी राऊत ईडी कार्यालयात हजर झाले. त्यावेळी त्यांची दहा तास चौकशी झाली होती.
१९ जुलै रोजी ईडीने राऊत यांना दुसरे समन्स जारी केले होते. मात्र संसदेचे अधिवेशन असल्यामुळे उपस्थित राहणे शक्य नसल्याचे सांगत ७ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याची विनंती त्यांनी केली होती.
ईडीने ही विनंती फेटाळत २७ जुलै रोजी राऊत यांना चौकशीसाठी
उपस्थित राहण्यासाठी तिसरे समन्स जारी केले होते. या चौकशीला राऊत अनुपस्थित राहिले.
३१ जुलै सकाळी सात वाजताच ईडीने राऊत यांच्या घरी धाडसत्र सुरू केले. मध्यरात्री अटक केली.
अशी झाली कारवाई
रविवारच्या छापेमारीसाठी ईडीने एकूण तीन पथके तयार केली होती. त्यात २५ अधिकारी होते. दोन पथके राऊत यांच्या भांडूप येथील निवासस्थानी सकाळी सात वाजता पोहोचली.
सर्च वॉरंट आणि समन्स दाखवत घरात प्रवेश केला. यावेळी घरी त्यांच्या पत्नी वर्षा, आई आणि भाऊ सुनील राऊत हे होते.
छापेमारीदरम्यान अन्य कोणत्याही व्यक्तीला प्रवेश देण्यात आला नाही. सकाळी साडेआठच्या दरम्यान आलेल्या जिम ट्रेनरला परत पाठवून दिले.
दोन पथकांमध्ये ११ अधिकाऱ्यांचा तर ४ क्लार्कचा समावेश होता. पाच अधिकारी आणि दोन क्लार्क यांनी राऊत यांच्या खोलीत त्यांची सहा तास चौकशी केली. उर्वरित ८ अधिकाऱ्यांनी घराची झडती घेतली.
तिसरी टीम राऊत यांच्या दादर येथील निवासस्थानी पोहोचली आणि तेथे त्यांनी झडती घेतली. दादर येथील हा फ्लॅट ईडीने यापूर्वीच जप्त केला आहे.
देशमुख, मलिक, परब अन् आता राऊत...
अनिल देशमुख : मुंबईतील बार मालकांकडून अंदाजे ४ कोटी ७० लाख रुपये स्वीकारल्याचा ठपका ठेवत ३ नोव्हेंबर २०२१ रोजी ईडीकडून अटक.
नवाब मलिक : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या एका हस्तकासोबत संबंधाच्या आरोपावरून २३ फेब्रवारी २०२२ रोजी अटक.
अनिल परब : दापोली येथील रिसॉर्टमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवत २०, २१, २२ जून २०२२ अशी सलग तीन दिवस चौकशी.
अर्जुन खोतकर : ७८ कोटी ३८ लाख रुपयांची जालना येथील मालमत्ता ईडीने २४ जून २०२२ रोजी जप्त केली.
प्रताप सरनाईक : नॅशनल स्पॉट एक्सेंजमधील घोटाळा प्रकरणात ११ कोटी ३५ लाख रुपयांची मालमत्ता २५ मे २०२२ रोजी जप्त.