'मातोश्री'वरुन आदेश आल्यास महाराष्ट्रात...; शिवसेना नेत्या सुषमा अंधारेंचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2022 11:18 AM2022-08-01T11:18:23+5:302022-08-01T11:23:45+5:30
शिवसेनेसाठी संजय राऊत आक्रमकपणे लढाई करत होते. आमचा संविधानावर विश्वास आहे. या देशातील न्याययंत्रणेवर लोकांचा विश्वास कायम राहिला पाहिजे असं सुषमा अंधारे यांनी सांगितले.
मुंबई - पक्षासाठी छातीचा कोट करून ईडी, सीबीआयशी लढणारे, लढाऊ स्वाभिमानी बाणा जपणारे संजय राऊत यांच्यावर ईडीची कारवाई सूडबुद्धीनेच केली आहे. आमचा सनदशीर लढाईवर विश्वास आहे. सकाळी ६ पासून सुरू झालेल्या कारवाईला संपूर्ण सहकार्याची भूमिका घेतली. परंतु याचा अर्थ शिवसेना शांत बसणाऱ्यांपैकी आहे असं नाही. कारण मातोश्रीवरून आदेश निघाल्यास महाराष्ट्रात काय वातावरण होईल यावर अधिक भाष्य करण्याची गरज नाही असा इशारा शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दिला आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या की, शिवसेनेसाठी संजय राऊत आक्रमकपणे लढाई करत होते. आमचा संविधानावर विश्वास आहे. या देशातील न्याययंत्रणेवर लोकांचा विश्वास कायम राहिला पाहिजे. संजय राऊतांच्या पाठिशी संपूर्ण पक्ष आहे. आम्ही ही लढाई जिंकणारच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा अखंड महाराष्ट्रावर यापुढेही असाच फडकत राहणार आहे. आम्ही शिवसैनिक संजय राऊतांसाठी लढत राहणार आहे असं त्यांनी सांगितले.
संजय राऊतांची संपत्ती किती?
मिळालेल्या माहितीनुसार, बँकेत संजय राऊतांच्या नावे बऱ्याच एफडी आहेत. शिवाय मुंबईसह अलिबागमध्येही त्यांच्या आणि पत्नीच्या नावे भूखंड, फ्लॅट असल्याची नोंद आहे. संजय राऊत यांनी राज्यसभेसाठी नामनिर्देशन अर्ज भरताना प्रतिज्ञापत्रावर आपली मालमत्ता, संपत्ती जाहीर केली होती. तेव्हा आपल्याकडे १ लाख ५५ हजार ७७२ रुपये रोकड असल्याचे संजय राऊत यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केलेय. बँक खात्यात १ कोटी ९३ लाख ५५ हजार ८०९ रुपये असल्याचे राऊतांनी सांगितले होते.
प्रतिज्ञापत्रानुसार, संजय राऊत यांच्याकडे ३ कोटी ३८ लाख ७७ हजार ६६६ रूपयांच्या ठेवी आहेत. २०२०-२१ या वर्षांत २७ लाख ९९ हजार १६९ रूपये कमावले. संजय राऊत यांच्याकडे अलिबागमध्ये जमिनीचे तीन तुकडे त्यांच्या नावावर आहेत. तर त्यांच्या पत्नीच्या नावे पालघरमध्ये ०.७३ एकरची जाग आहे. ही जागा २०१४ मध्ये खरेदी करण्यात आली आहे. सध्या या जागेची किंमत ९ लाख रूपये आहे. संजय राऊत यांच्या नावे दादरमध्ये एक घर आहे. भांडुप आणि आरे मिल्क कॉलनीमध्ये एक एक घर आहे.
आम्ही त्यांना दाखवूनच देऊ
संजय राऊत यांच्यावरील कारवाई हा लोकशाहीचा, विरोधकांचा गळा घोटण्याचा प्रयत्न आहे. जो हिंदूंचा, मराठी माणसाचा आणि शिवसेनेचा आवाज बुलंद करतोय, त्याचाच गळा घोटण्याचा डाव आहे. शेवटच्या क्षणापर्यंत या जुलूमशाहीविरोधात लढत राहू आणि महाराष्ट्राची माती काय असते, तिथला पराक्रम काय असतो, हे दाखवून देऊ, असा इशारा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला.