"महाराष्ट्रात मृत्यूचं तांडव सुरू आहे, पण...", शिंदे-फडणवीसांवर संजय राऊतांचा जोरदार निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2023 12:54 PM2023-10-04T12:54:30+5:302023-10-04T13:04:12+5:30
शिंदे-फडणवीसांचा दिल्ली दौरा आणि राज्यातील रुग्णालयातील मृत्यूच्या घटना यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे.
नांदेडमधील शासकीय रुग्णालयात २४ तासांत २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली होती. यामुळे राज्यातील आरोग्य विभागात खळबळ उडाली. या घटनेवरुन आरोग्य यंत्रणेवर जोरदार टीका करण्यात येत आहे. दुसरीकडे, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल अचानक दिल्लीला दाखल झाले. दिल्लीत त्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत राज्यातील राजकीय विषयांवर बैठकीत चर्चा झाल्याचे समोर येत आहे.
दरम्यान, शिंदे-फडणवीसांचा दिल्ली दौरा आणि राज्यातील रुग्णालयातील मृत्यूच्या घटना यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. "महाराष्ट्रात मृत्यूचं तांडव सुरू आहे, असे असताना राज्याचे एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांना त्यांची चिंता नाही. हे राजकारणात अडकलेले आहेत. कोणाला पालकमंत्री, कोणाला खाते बदलून...अशातच ते अडकले आहेत. नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड या ठिकाणी लोकांचा आक्रोश पाहा… याकडे सरकारचे लक्ष नाही. ह्यांचा काय सत्कार करायचा का? ", असा घणाघात संजय राऊतांनी केला आहे. तसेच, महाराष्ट्र हे आजारी राज्य होत चालले आहे. राजकीय दृष्ट्या महाराष्ट्र आजारी झाला आहे. या लोकांनी महाराष्ट्राला आजारी राज्य बनवले, हे बरोबर नाही, असे संजय राऊत म्हणाले.
अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांच्या घरी छापा टाकला आहे. या कारवाईवर संजय राऊत यांनी टीका केली आहे. भाजपची सत्ता असलेल्या ठिकाणी छापे का टाकले जात नाहीत? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. संजय राऊत म्हणाले की, संजय सिंह हे खासदार आहेत. त्यांच्या घरावर छापे टाकले जात आहेत. आमच्यावर छापे टाकले जातात, हे महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, छत्तीसगडमध्ये घडते. झारखंड, गुजरात, मध्य प्रदेश, आसाम आणि इतर जिथे त्यांची (भाजप) सत्ता आहे, तिथे छापे का टाकले जात नाहीत? माहिती हवी असेल तर कुठे घोटाळे होत आहेत, याची माहिती आम्ही देतो. मात्र, ज्या पद्धतीने संजय सिंह यांच्या घरी छापे टाकले जात आहेत, त्यावरुन मला असे वाटते की, ही हुकूमशाहीची हद्द आहे.
याचबरोबर, दिल्लीत काही पत्रकारांवर कारवाई झाली. त्यावरही संजय राऊत यांनी भाष्य केले. आठ-नऊ पत्रकारांवर कारवाई केली गेली आहे. चीनकडून फंडिंग मिळतो, अशा प्रकारचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे. हे हास्यास्पद आहे. बेडरपणे हे पत्रकार सरकारला प्रश्न विचारण्याचं काम करतात. चीन हस्तक्षेप करत आहे, त्याबाबत तुम्हाला राग येत नाही. पत्रकांवर धाडी घालत आहात. हे ते चुकीचं आहे, असे संजय राऊत म्हणाले.