Sanjay Raut Bail: तुरुंगाबाहेर येताच संजय राऊत म्हणाले- 'आम्ही लढणारे आहोत, लढत राहू...'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2022 07:14 PM2022-11-09T19:14:06+5:302022-11-09T19:22:33+5:30
Sanjay Raut Bail: खासदार संजय राऊत यांना कोर्टाने जामीन मंजूर केला, 100 दिवसानंतर राऊत तुरुंगातून बाहेर आले.
Sanjay Raut Bail: मुंबईतील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना पीएमएलए कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. 100 दिवसानंतर राऊत तुरुंगातून बाहेर आले. राऊतांना जामीन मिळाल्याने ठाकरे गटाच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत उत्साहाचे वातावरण आहे. ऑर्थर रोड कारागृहाबाहेर राऊतांची एक झलक पाहण्यासाठी शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली.
#WATCH | Shiv Sena (Uddhav Thackeray faction) leader Sanjay Raut released from Arthur Road jail after Mumbai's PMLA court granted him bail in Patra Chawl land scam case earlier today. pic.twitter.com/9LnLnmV3aI
— ANI (@ANI) November 9, 2022
तुरुंगाबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
गळ्यात भगवा गमछा परिधान करुन संजय राऊत ऑर्थर रोड मध्यवर्ती कारागृहातून बाहेर आले. यावेळी, शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला होता. कोण आला रे कोण आला... शिवसेनेचा वाघ आला... अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. तुरुंगातून बाहेर येताच राऊत गाडीत बसले आणि उपस्थित शिवसैनिकांना नमस्कार केला.
संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
यावेळी संजय राऊत कारमधून बाहेर आले आणि कार्यकर्त्यांची हार स्विकारले. त्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना पुन्हा एकदा जुने राऊत दिसून आले. 'बाहेर आलोय, बघू आता पुढे काय होतंय. आम्ही लढणारे आहोत, लढत राहू. न्यायालयानेच माझी अटक बेकायदेशीर ठरवलीये. कार्यकर्त्यांनी कार्यक्रम ठरवला आहे, तिकडेच जातोय. बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जाणारच आहे,' अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली.
बंगल्यावर दिवाळीसारखे वातावरण
ईडीने अटकेची कारवाई केल्यानंतर राऊत गेले 102 दिवस तुरुंगात होते. मात्र, आज न्यायालयातून जामीन मिळाल्याने राऊत यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष संजय राऊत यांचा जामीन सण म्हणून साजरा करत आहे. शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. संजय राऊत यांच्या भांडुप येथील 'मैत्री' निवासस्थानी डीजे लावण्यात आला आहे. तसेच, बंगल्यात दसरा आणि दिवाळीसारखे वातावरण पाहायला मिळत आहे.
उद्धव ठाकरे राऊतांची भेट घेणार
संजय राऊत यांच्या सुटकेनंतर उद्धव ठाकरे त्यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचू शकतात, अशी चर्चा आहे. संजय राऊत यांचे तुरुंगातून बाहेर येणे, हा सत्याचा विजय अशी प्रतिक्रिया शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेसकडून येत आहे. संजय राऊतच्या सुटकेनंतर ट्विटरवर टायगर इज बॅक ट्रेंड करत आहे.