Sanjay Raut Bail: 'एकच शिवसेना खरी, बाकी धोत्र्याच्या कडू बिया', संजय राऊत पुन्हा कडाडले...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2022 08:05 PM2022-11-09T20:05:37+5:302022-11-09T20:06:20+5:30
Sanjay Raut Bail: 'महाराष्ट्र कोणाच्या मागे आहे, ते त्यांना हळुहळू कळेलच.'
Sanjay Raut Bail: कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना पीएमएलए कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. 100 दिवसानंतर राऊत तुरुंगातून बाहेर आले. राऊतांना जामीन मिळाल्याने ठाकरे गटाच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत उत्साहाचे वातावरण आहे. तुरुंगाबाहेर आल्यानंतर राऊत आपल्या जुन्या स्टाईलमध्ये परतले आहेत.
आमचा कणा मोडलेला नाही
तुरुंगातून बाहेर आल्यानंतर संजय राऊत भव्य रॅलीत सामील होऊन घराकडे निघाले आहेत. यावेळी माध्यमांना प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले की, 'मी गेल्या शंभर दिवसांपासून तुरुंगात होतो. बाहेर काय सुरू होतं, ते आत राहून कळतं नव्हतं. बाहेर येऊन समजतंय की, आता उद्धव ठाकरेंचीशिवसेना झाली आहे. पण, आमचा कणा मोडलेला नाही. आम्ही शिवसैनिक आहोतत, लढत राहू.'
एकच शिवसेना खरी
ते पुढे म्हणतात की, 'आमचं आयुष्य बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंसोबत गेलं. एकच शिवसेना खरी आहे, ती म्हणजे बाळासाहेबांनी निर्माण केलेली आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील. बाकी सगळ्या धोत्र्याच्या कडू बिया आहेत. हा महाराष्ट्र-मुंबई कोणाच्या मागे आहे, ते त्यांना हळुहळू कळेलच.'
आता तर मशाल आहे...
'त्यांचं हे तात्पुरतं राजकारण सुरू आहे. आता बाहेर आलोय, हळुहळू कामाला लागू. गेल्या 30-35 वर्षांपासून मुंबई महापालिकेवर बाळासाहेबांचा भगवा फडकत आहेत, तो तसाच फडकत राहणार. त्या भगव्याला कोणी हात लावाल, तर जळून खाक व्हाल. असे तेज त्या भगव्यात बाळासाहेबांनी निर्माण केलं आहे. आता तर मशाल आहे...' अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली.