Sanjay Raut Bail: संजय राउतांना जामीन मिळताच शिवसेनेत जल्लोषाचे वातावरण; DJ बूक, बंगलाही सजवला...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2022 06:22 PM2022-11-09T18:22:25+5:302022-11-09T18:23:45+5:30
Sanjay Raut Bail: न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर उद्धव ठाकरेंनी फोन करुन संजय राऊतांना शुभेच्छा दिल्या.
Sanjay Raut Bail: मुंबईतील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना पीएमएलए कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. तब्बल 100 दिवसानंतर राऊत यांना जामीन मंजूर झाला आहे. राऊतांना जामीन मिळाल्याने ठाकरे गटाच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत उत्साहाचे वातावरण आहे.
उद्धव ठाकरेंचा राऊतांना फोन
न्यायालयाचा निर्णय येताच उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना फोन करून अभिनंदन केले आणि त्यांची भेट घेण्याबाबत बोलले. संजय राऊत कोठडीत असल्याने उद्धव यांना थेट बोलता आले नाही. मात्र त्यांचा संदेश संजय राऊत यांच्यापर्यंत पोहोचला आणि प्रत्युत्तरात राऊतांनी त्यांचे आभार मानले. आज राऊतांना विशेष पीएमएलए न्यायालयाने जामीन मंजूर केला असून जामिनावर स्थगिती देण्याची ईडीची मागणी फेटाळून लावली आहे.
संबंधित बातमी- 'संजय राऊतांवर दबाव होता, पण त्यांनी गद्दारी नाही केली', आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
डीजे बुक, बंगल्यावर दिवाळीसारखे वातावरण
ईडीने अटकेची कारवाई केल्यानंतर राऊत गेले 102 दिवस तुरुंगात होते. मात्र, आज न्यायालयातून जामीन मिळाल्याने राऊत यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष संजय राऊत यांचा जामीन सण म्हणून साजरा करत आहे. शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. संजय राऊत यांच्या भांडुप येथील 'मैत्री' निवासस्थानी डीजे लावण्यात आला आहे. तसेच, बंगल्यात दसरा आणि दिवाळीसारखे वातावरण पाहायला मिळत आहे.
उद्धव ठाकरे राऊतांची भेट घेणार
संजय राऊत यांच्या सुटकेनंतर उद्धव ठाकरे त्यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचू शकतात, अशी चर्चा आहे. संजय राऊत यांचे तुरुंगातून बाहेर येणे, हा सत्याचा विजय अशी प्रतिक्रिया शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेसकडून येत आहे. संजय राऊतच्या सुटकेनंतर ट्विटरवर टायगर इज बॅक ट्रेंड करत आहे.