“११ कोटी जनतेचे लाडके नेते उद्धव ठाकरेंकडे पुन्हा राज्याची सूत्रे, मुख्यमंत्री...”: संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2024 07:06 PM2024-09-15T19:06:20+5:302024-09-15T19:06:54+5:30
Thackeray Group MP Sanjay Raut News: उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे लाडके नेते, राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे पुन्हा उद्धव ठाकरेंकडेच येतील आणि सुखाचे दिवस येतील, असे संजय राऊतांनी म्हटले आहे.
Thackeray Group MP Sanjay Raut News: महाराष्ट्रामध्ये एकमेव लाडका भाऊ, लाडका मुलगा कुणी असेल, तर ११ कोटी जनतेचा एकमेव लाडका नेता आहे, तो म्हणजे उद्धव ठाकरे. ज्या दिवशी तुमचा आमचा लाडका नेता, पुन्हा सत्तेवर येईल, पुन्हा मुख्यमंत्री होईल, त्या दिवशी या महाराष्ट्रातील प्रत्येक घटकाला सुखाचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही, असा मोठा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला.
एका सभेला संबोधित करताना संजय राऊत म्हणाले की, समाजातील प्रत्येक घटकाचा विचार करून राज्य करणारा एकमेव नेता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर आला, त्यांचे नाव उद्धव ठाकरे. जुन्या पेन्शन योजनेबाबत सुरू असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी गेलो होतो. हजारो लाखो कर्मचारी उपस्थित होते. तिथेही लोक म्हणाले की, उद्धव ठाकरे तुम्हीच मुख्यमंत्री व्हा. राज्य तुमच्या हातात येऊ द्या. हे राज्य आमच्या हातात होते, तेव्हा उद्धव ठाकरेंनी सर्वांची चिंता वाहिली, असे कौतुकोद्गार संजय राऊत यांनी काढले.
मतांसाठी १५०० रुपयांत बहिणींना विकत घेतले जात आहे
आता आम्ही वाट पाहतोय विधानसभा निवडणुक कधी येते, या ४० गद्दारांना कसे पाडतो, याची तयारी होताना दिसत आहे. श्रद्धा आणि सबुरी आता संपली, असे म्हणत संजय राऊत यांनी शिवसेना शिंदे गटावर हल्लाबोल केला. तसेच, सत्ताधाऱ्यांकडून १५०० रुपयांत बहिणीला मतांसाठी विकत घेतले जात आहे. या राज्याची सूत्रे पुन्हा एकदा शिवसेनेकडे येणार आहेत. मराठवाड्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर आहे, पण सरकार बांधावर आलं नाही. मराठ्यांचा सुपुत्र असलेले कृषिमंत्री पायाला माती लागेल म्हणून पाहणी करण्यासाठी खाली उतरले नाहीत. या अशा लोकांचे राज्य महाराष्ट्र आहे. हे सरकार घालवावे लागेल, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज यांचा १८ कोटींचा पुतळा केवळ १२ लाख रुपयांत उभा करण्यात आला. त्यामुळेच, वाऱ्याच्या झुळकीने हा पुतळा पडला, पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार करणारे हे सरकार आहे. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे रक्षण हे करू शकले नाहीत, त्यामुळे या राज्याचे सत्ता पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या निमित्ताने शिवसेनेकडे दिली पाहिजे, असे आवाहन संजय राऊतांनी केले.