Sanjay Raut: 'पुढचे 25-30 वर्षे आम्हीच असणार, राज्यात भाजपचा मुख्यमंत्री होणार नाही'; संजय राऊतांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 11:54 AM2022-01-31T11:54:11+5:302022-01-31T11:54:57+5:30
Sanjay Raut:'भाजपने स्वत:च अंधाऱ्या विहिरीत उडी मारली, आता त्यांनी महाराष्ट्राला विसरुन जावं'
मुंबई: भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत अजूनही खटके उडत आहेत. भाजप आणि शिवसेनेचे नेते सतत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असतात. संजय राऊत (sanjay raut) यांनी आज पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला. 'भाजपने स्वत:च अंधाऱ्या विहिरीत उडी मारली आहे. निराश मनाने राजकारण करतात त्यांच्या नशिबी शेवटपर्यंत निराशाच असते. यामुळेच काहीही झाले तरी महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री होणार नाही, असे संजय राऊत म्हणाले.
भाजप सत्तेत येणार नाही
मीडियाशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, 2024मध्ये निवडणूक होईल, त्यात दिल्लीतील चित्रं बदलून जाईल. भाजपने आता महाराष्ट्रालाही विसरुन जावं. त्यांचे 75-100 उमेदवार जिंकतीलही, पण, भविष्यात महाविकास आघाडी (mahavikas aghadi) सत्तेत असेल. पुढचे 25-30 वर्षे तरी त्यांची सत्ता येणार नाही. तोपर्यंत भाजप राहिल की नाही माहीत नाही, असा टोला राऊतांनी लगावला.
यापुढे भ्रष्ट हातमिळवणी होणार नाही
ते पुढे म्हणाले की, आमच्या तिन्ही पक्षांनी जास्तीत जास्त नगराध्यक्ष निवडून आणण्यासाठी एक पत्रक जारी केले आहे. तीन पक्षांनी एकत्र येऊन ही भूमिका घेतली आहे. स्थानिक राजकारणाच्या नावाखाली अनेकदा भ्रष्ट हातमिळवण्यात होत असतात. युतीत असतानाही आमच्या काही लोकांनी केल्या होत्या. अशा प्रकारची मनमानी आता चालणार नाही. शिवसेनेकडून असं काही होऊ नये यासाठी आम्ही दक्षता घेत आहोत, असंही ते म्हणाले.
निवडणूक आयोग गुलाम
उत्तर प्रदेशात शिवसेनेच्या उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात आले. आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार केली, पण तिकडे भाजप अडचणीत असल्यामुळे आयोग आमच्या तक्रारीची दखल घेत नाही. पुरावे समोर ठेवूनही आयोग सुनावणी घ्यायला तयार नाही. ही मनमानी आणि हुकूमशाही आहे. निवडणूक आयोग गुलाम झाल्याचे लक्षण आहे, अशी टीकाही त्यांनी केली.