"उबाठाची मते फोडून संजय राऊतांनी..."; विधान परिषद निवडणुकीबाबत BJP आमदाराचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 09:39 AM2024-07-23T09:39:12+5:302024-07-23T09:43:40+5:30
विधान परिषदेच्या निवडणुकीत काही आमदारांनी क्रॉस व्होटिंग केले त्यामुळे मविआच्या उमेदवाराचा पराभव झाल्याचं दिसलं. आता या फोडाफोडीवरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
नागपूर - संजय राऊतांना दुसरं काही काम नाही. सकाळी मीडियासमोर जाऊन विधानं करायची आणि दिवसभर चर्चेत राहायचं काम ते करतात. उबाठाचे कोणती मते फोडून राष्ट्रवादीचे उमेदवार शेकापच्या जयंत पाटलांना द्यायला लावली याची चौकशी उद्धव ठाकरेंनी करावी. या निश्चित मोठा गौडबंगाल ठाकरेंना पाहायला मिळेल असा आरोप भाजपा आमदार परिणय फुके यांनी केला आहे.
आमदार परिणय फुके म्हणाले की, मिलिंद नार्वेकरांचं क्रॉस व्होटिंग झालं की नाही माहिती नाही. परंतु मिलिंद नार्वेकरांनी फार मोठा घोडेबाजार करण्याचा प्रयत्न केला. मात्र ते स्वत:च्या आमदारांची मते राखू शकली नाही. जी मते फुटली त्यात काँग्रेसचीच नव्हे तर उद्धव ठाकरे गटाचीही आहेत. माझ्या माहितीप्रमाणे संजय राऊतांनी ही मते फोडून राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांकडे वळवली. या प्रकरणाचीही चौकशी व्हावी असं त्यांनी म्हटलं.
तसेच संजय राऊतांची भूमिका संशयास्पद आहे. राऊतांनी कुणाच्या सांगण्यावरून शिवसेना फोडली हे सगळ्यांना माहिती आहे. आता उरलेली उबाठा आहे तीदेखील फोडण्याचा संजय राऊतांचा कट आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांपासून सावध राहावं. जे २० आमदार फुटले त्यात उबाठाच्या काही आमदारांना फोडून शरद पवारांच्या उमेदवारांकडे किती मते गेली याची चौकशी करावी. महायुतीच्या कामाने प्रभावित असणारे, मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणाऱ्यांचं आमच्याकडे स्वागत आहे असंही आमदार परिणय फुके यांनी सांगितले. टीव्ही ९ च्या मुलाखतीत ते बोलत होते.
दरम्यान, मविआतील अनेक आमदार महायुतीला मतदान करण्याकडे उत्सुक असण्यापेक्षा ते काँग्रेस, उद्धव ठाकरे, शरद पवारांच्या नेतृत्वावर नाराज होते. त्यामुळे ही नाराजी व्यक्त करण्यासाठी या आमदारांनी महायुतीला मतदान केले. कुठल्याही आमदाराला आम्ही संपर्क अथवा विनंती केली नाही. मात्र त्या आमदारांनीच त्यांची नाराजी व्यक्त करण्यासाठी महायुतीला मतदान केले असंही परिणय फुके यांनी म्हटलं.
देवेंद्र फडणवीसांना अटक करा - राऊत
तुमचा भ्रष्टाचार, तुमचा पक्ष आणि हे सरकार भ्रष्टाचारातून आलेले आहे. पैसा फेको, तमाशा देखो असं आहे. देवेंद्र फडणवीस बोलतात महाविकास आघाडीचे २० आमदार फोडले, हे चिंचोके देऊन फोडले का?, केंद्रीय गृहमंत्र्यांना भ्रष्टाचार नकोय ना, मग देवेंद्र फडणवीसांना अटक करा. २० आमदार फोडले, फडणवीसांनी किती पैसे दिले, ईडी, सीबीआय चौकशी फडणवीसांच्या मागे लावा. तुम्ही सच्चे असाल ना, पहिली चौकशी देवेंद्र फडणवीसांची करा असं संजय राऊतांनी अमित शाहांना आव्हान केले.