Maharashtra Politics: “बाळासाहेबांच्या अपमानावर मुख्यमंत्री अन् ४० जणांची टोळी काही भूमिका घेणार आहे का?”: संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 12:38 PM2023-04-12T12:38:11+5:302023-04-12T12:40:53+5:30
Maharashtra News: हिंमत असेल तर चंद्रकांत पाटलांचा राजीनामा मागा आणि मग सांगा की, तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार आहात, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
Maharashtra Politics: नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिवसेना शिंदे गट आणि भाजपचे नेते मंत्री यांचा अयोध्या दौरा झाला. यानंतर बाबरी मशीद विध्वंसाप्रकरणी भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटावर घणाघाती टीका केली आहे. बाळासाहेबांच्या अपमानावर मुख्यमंत्री अन् ४० जणांची टोळी काही भूमिका घेणार आहे का?, असा सवालही संजय राऊत यांनी केला आहे.
तुम्ही स्वतःला हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार म्हणून मिरवताय तर मग बाळासहेबांच्या अपमानानंतर तुम्ही शांत का? बाळासाहेबांचा अपमान करणारे तुमच्यासोबत मंत्रिमंडळात असतील, तुम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावून सत्तेत बसत असाल तर तुम्ही लाचार, लोचट आणि मिंधे आहात. महाराष्ट्र तुम्हाला मिंधे म्हणत असेल तर त्यात महाराष्ट्राचे काय चुकले. तुम्ही केवळ नाराजी कसली व्यक्त करताय? मूळात बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान असू नये. बाळासाहेबांच्या अपमानावर मुख्यमंत्री आणि त्यांची ४० जणांची टोळी काही भूमिका घेणार आहे का? अशी विचारणा संजय राऊत यांनी केली.
तुम्हाला हे जमत नसेल तर स्वतः राजीनामा द्या
याप्रकरणी खुलासे चालणार नाहीत, आणि तुम्ही नाराजी कसली व्यक्त करताय, तेही जमत नसेल तर बाळासाहेबांचे नाव घेऊ नका. हिंमत असेल तर चंद्रकांत पाटलांचा राजीनामा मागा आणि मग लोकांना सांगा की, तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार आहात. तुम्हाला हे जमत नसेल तर स्वतः राजीनामा द्या, असे आव्हान संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले. तसेच संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.
दरम्यान, बाबरी पाडण्यामध्ये बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि दुर्गा वाहिनी यांचा सहभाग होता, शिवसेनेचा एकही कार्यकर्ता नव्हता असे वक्तव्य भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले होते. यावर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना इशारा दिला आहे. विषय गंभीर असून चंद्रकांत पाटील बाबरीच्या खंदकातून बाहेर पडले आहेत, जेव्हा बाबरी पाडली तेव्हा सगळे उंदीर बिळात होते. सध्याचे पंतप्रधान पण कुठेच नव्हते, असे प्रत्युत्तर ठाकरे यांनी दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"