“नोव्हेंबरनंतर राज्यात आपलाच मुख्यमंत्री, मग सगळे प्रश्न सुटतील”; संजय राऊतांचे मोठे विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2024 11:33 PM2024-06-23T23:33:06+5:302024-06-23T23:33:50+5:30
Sanjay Raut News: राज्य सरकार शिक्षकांच्या प्रश्नावर कोणी भूमिका घेताना दिसले नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे गेलेले अनेक प्रश्न सुटले, असे संजय राऊतांनी म्हटले आहे.
Sanjay Raut News: लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झाली आहे. तत्पूर्वी, विधान परिषदेच्या निवडणुकांसाठीचा प्रचार शिगेला पोहोचत आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीकडून किशोर दराडे उमेदवार असून, महाविकास आघाडीने संदीप गुळवे यांना उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप गुळवे यांच्या प्रचारार्थ शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक मेळावा घेतला. नोव्हेंबरनंतर राज्यात आपलाच मुख्यमंत्री असेल. त्यामुळे त्यानंतर सगळे प्रश्न सुटतील, असे मोठे विधान संजय राऊत यांनी केले आहे.
या निवडणुकीत चिन्ह नाही. त्यामुळे उमेदवाराचे नाव लक्षात ठेवा. आमचा मुंबईतील अनुभव वाईट आहे. मुंबईत मते जास्त बाद होतात याची कारणे शोधावे लागेल. लोका सांगे ब्रम्हज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण. इथे बोगस शिक्षक, बोगस शिक्षकेत्तर कर्मचारी नोंदविले गेले आहेत. त्यामुळे, बोगस मदतदार शोधून काढावेत, त्यांच्यावर खटले दाखल करावे, त्यांची नोदणी करणाऱ्यांवरही खटले दाखल करावे. आम्ही राजकारणातील लोक आहोत आम्ही हेराफेरी करतो, मतदार आणतो, बसवतो. शिक्षक विभागाची निवडणूक सोपी नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेपेक्षा मोठी यात्रा आहे
उमेदवार संदीप गुळवे मतदारसंघ पिंजून काढत आहेत. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेपेक्षा मोठी यात्रा आहे. मुख्यमंत्री कशासाठी आले होते. शिक्षणाचा आणि त्यांचा संबंध पाहिजे. आतापर्यंत शिक्षणाचा व्यापार झाला नव्हता. बाजार झाला नव्हता. गेल्या काही दिवसात शिक्षकाच्या हातात भिकचे कटोरे देण्याचे काम या राज्य सरकारने केले. त्यांनी शिक्षकांच्या मताचा भाव लावला. असा मुख्यमंत्री या राज्याला लाभला आहे. देशाचे पंतप्रधान अनेक बाता करतात. आमदारांना विकत घेण्यासाठी मते विकत घेण्यासाठी पैसे आहे. सरकार पाडण्यासाठी ५० कोटी आले. मते विकत घेण्यस्थी खोके आले. परंतु, शिक्षकांच्या प्रश्नावर कोणी भूमिका घेताना हे दिसले नाहीत. शिक्षण क्षेत्र आणि शाळा यांच्या संबंध नसलेले राज्यकर्ते लाभले, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
नोव्हेंबरनंतर या राज्यात आपला मुख्यमंत्री होणार आहे
पैश्याची ताकद सत्ता टिकवण्यासाठी आहे. शिक्षकांच्या स्वाभिमानाचा लिलाव करू शकत नाही. आश्रम शाळा आणि आदिवासींचे प्रश्न आधी का सोडवले नाही, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे गेलेले अनेक प्रश्न सोडवले. अंगणवडी सेवकांचे प्रश्न सुटले. ४० हजार पेक्षा जास्त मते गुळवे यांना मिळतील. विधी मंडळात शिक्षकांच्या प्रश्नांसाठी आम्हीही आग्रही असू. नोव्हेंबरनंतर या राज्यात आपला मुख्यमंत्री होणार आहे. त्यामुळे सगळे प्रश्न सुटतील, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
दरम्यान, पाच जिल्ह्यात प्रचारासाठी फिरलो. तुमच्या आशिर्वादाने मी विधानपरिषदेत जाईन. जुनी पेन्शन, शिक्षक भरती, मेडिकल बील, टप्पा अनुदान, अनुदानित शाळा करणे, विनाअनुदानित शाळांचे प्रश्न सोडवेन. मला दिलेल्या संधीचे सोने करेन. मला नाव सांगावे लागत आहे त्याचे कारण म्हणजे समोरच्या उमेदवाराने डमी उमेदवार दिला आहे, असे नाशिक शिक्षक मतदारसंघ महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप गुळवे यांनी म्हटले आहे.