“साजन पाचपुते अन् राणी लंके विधानसभेत जातील”; संजय राऊतांनी थेट केली उमेदवारीची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2024 10:42 AM2024-07-14T10:42:58+5:302024-07-14T10:44:43+5:30
Sanjay Raut News: राजकारण करत असताना आपण खोट बोलायचे नाही, खोटे बोलण्याचा मक्ता नरेंद्र मोदींना दिला आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली.
Sanjay Raut News: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने मोर्चेबांधणीला सुरुवात केल्याचे पाहायला मिळत आहे. लोकसभेनंतर विधान परिषद निवडणुकीत यश मिळाल्यानंतर ठाकरे गटाचा आत्मविश्वास दुपटीने वाढल्याचे सांगितले जात आहे. अलीकडेच लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या वसंत मोरे यांनीही ठाकरे गटात घरवापसी केली. यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी साजन पाचपुते आणि राणी लंके विधानसभेत जातील, असे सांगत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी त्यांच्या उमेदवारीची घोषणाच केली.
श्रीगोंदा येथे ठाकरे गटाचे उपनेते साजन पाचपुते यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन संजय राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा यांच्यावर टीका करताना आगामी विधानसभा निवडणुकांबाबत थेट भाष्य केले. शिवसेनेला आणि शिवसैनिकांना चांगले दिवस आले. लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांना चांगली मते मिळाली. त्यामुळे आता विधानसभेत हीच जादू चालणार आहे. शिवसेना उपनेते साजन पाचपुते आणि खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके या विधानसभेत जातील, अशी घोषणा संजय राऊतांनी केली.
नकली पाचपुते यांना हटवून असली पचपुते यांना आणायचे
नकली शिवसेना आणि असली शिवसेना, असे नरेंद्र मोदी म्हणाले. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना महाराष्ट्राने जागा दाखवून दिली. हे राज्य गुजरातला आम्ही विकले नाही. मुंबईतील अनेक उद्योग गुजरातला घेऊन गेले. आता नकली पाचपुते यांना हटवायचे आहे आणि असली पचपुते यांना आणायचे आहे. येथील आमदारांनी काय काम केले, पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. खासदार निलेश लंके यांनी आता पाणी प्रश्न हाती घेतलेला आहे. हात जोडून काम नाही झाले तर हात सोडून काम करावे लागते, असे सूचक विधान संजय राऊतांनी केले.
दरम्यान, राजकारणात किती खोटेपणा असावा, याचे उदाहरण म्हणजे राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षाची चोरी आहे. राजकारण करत असताना आपण खोट बोलायचे नाही, खोटे बोलण्याचा मक्ता आपण नरेंद्र मोदींना दिला आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली.