Maharashtra Political Crisis: “निवडणुका होऊ द्यात, शिवसेना १०० हून जास्त जागा जिंकेल”; संजय राऊतांचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 11:57 AM2022-07-05T11:57:49+5:302022-07-05T11:58:49+5:30
Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे चिरंजीव असून, ते दुधखुळे नाहीत. ते स्वतःचे निर्णय स्वतः घेतात, असे संजय राऊतांनी म्हटले आहे.
नवी दिल्ली/मुंबई:शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर नव्या शिंदे-फडणवीस सरकारने विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकला. नव्या सरकारला १६४ मते मिळाली, तर विरोधात ९९ मते पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात केलेल्या भाषणानंतर शिवसेना नेते आणि खासदार (Sanjay Raut) यांनी पलटवार केला आहे. आता निवडणुका जरी लागल्या, तरी शिवसेनेला १०० हून जास्त जागा मिळतील, असा दावा करत, आम्ही तयार आहोत, असे आव्हान संजय राऊत यांनी दिले.
प्रसारमाध्यमांशी बोलताना, शिंदे गटातील आमदारांवर बोलताना ममता बॅनर्जी यांनी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. सर्व आमदारांना केवळ पैसे नाही मिळालेत, त्यांना आणखीही खूप काही मिळाले आहे. पण आता नवे सरकार महाराष्ट्रात स्थापन झाले आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोघांनीही महाराष्ट्राच्या हितासाठी काम केले पाहिजे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
उद्धव ठाकरे हे दुधखुळे नाहीत. ते बाळासाहेबांचे चिरंजीव आहेत
उद्धव ठाकरेंच्या अवतीभवती असणाऱ्या चार लोकांमुळे शिवसेनेची ही अवस्था झाली, असा आरोप गुलाबराव पाटील यांनी विधानसभेत बोलताना केला होता. त्यावर बोलताना, या चार लोकांमुळेच तुम्हाला सत्ता मिळाली. ती जी चार लोक ते म्हणतायत. ते सतत पक्षाचे काम करत होते. आजही पक्षाचेच काम करत आहेत. अडीच वर्ष का होईना तुम्ही सत्तेत होतात, तेव्हाही हे चार लोक, ज्यांना तुम्ही आज बदनाम करण्याचा प्रयत्न करताय, ते आजही पक्षाचे निष्ठावान आहेत. उद्धव ठाकरे हे दूधखुळे नाहीत. ते बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव आहेत. ते स्वतःचे निर्णय स्वतः घेतात. जाणाऱ्यांना फक्त बहाणा हवा असतो. ठिक आहे तुम्ही जा, बहाणे सांगू नका, या शब्दांत संजय राऊत यांनी हल्लाबोल केला.
ते बाळासाहेब ठाकरेंचेच शिवसैनिक
व्हीप उल्लंघन केल्याप्रकरणी आदित्य ठाकरे वगळता अन्य १४ आमदारांवर कारवाई करा, अशा आशयाचे पत्र शिंदे गटाकडून विधानसभा अध्यक्षांना पाठवण्यात आले आहे. यावर प्रतिक्रिया देताना, १४ आमदारांना नोटीस पाठवली आहे. ते बाळासाहेब ठाकरेंचेच शिवसैनिक आहेत. मुख्यमंत्री ज्यावेळी विश्वासदर्शक ठराव जिंकतात, त्यावेळी त्यांना आपल्या भूमिका मांडाव्या लागतात. त्यांनी राज्याची भूमिका न मांडता, त्यांनी पक्षाविरोधात बंड का केले? यावर खुलासे दिले. नारायण राणेंचे भाषणही याच प्रकारचे होते. छगन भुजबळांचे भाषणही असेच होते. पक्ष सोडणारा किंवा पक्षाशी प्रतारणा करणारा नेता ज्यावेळी भाषण करतो त्यावेळी त्याला खुलासेच द्यावे लागतात, असे संजय राऊत यांनी सुनावले.