“या देशाने रडणारा पंतप्रधान पहिल्यांदाच पाहिला”; संजय राऊतांचा नरेंद्र मोदींवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2023 02:05 PM2023-05-01T14:05:58+5:302023-05-01T14:07:42+5:30
Sanjay Raut News: जाहीर सभेत जाऊन कोणी रडले नाही, शिव्यांची यादी घेऊन गेले नाहीत, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
Sanjay Raut News: कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही एका सभेला संबोधित करताना काँग्रेस आणि जेडीएसवर जोरदार टीका केली. तसेच ९१ वेळा काँग्रेसने शिवीगाळ केल्याचे सांगत काँग्रेस नेत्यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तरही दिले. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत, या देशाने रडणारा पंतप्रधान पहिल्यांदाच पाहिला, असा खोचक टोला लगावला.
प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्र अस्थिर दिसण्यास हुकूमशाही प्रवृत्ती कारणीभूत आहे. पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचे संविधानावर प्रेम नाही. मन की बातवर जेवढे प्रेम आहे तेवढे प्रेम त्यांनी संविधानावर दिसायला हवे होते. मन की बातची काय गरज होती? देशाला रोजगाराची गरज आहे. सत्यपाल मलिक यांनी केलेल्या आरोपाची चौकशी करण्याची गरज आहे. संविधान वाचवण्याची गरज आहे. पण तुम्ही मन की बातमध्येच घुटमळत आहात. काय आहे मन की बात? जन की बात ऐका, या शब्दांत संजय राऊत यांनी मन की बात कार्यक्रमावर टीकास्त्र सोडले.
या देशाने रडणारा पंतप्रधान पहिल्यांदाच पाहिला
या देशाने रडणारा पंतप्रधान पहिल्यांदाच पाहिला. यापूर्वी देशात ज्यांनी ज्यांनी राज्य केले त्यांच्यावर अनेकांनी टीका केली. पण ते सभेत जाऊन रडले नाहीत. नेहरूंनाही टीका सहन करावी लागली. लालबहादूर शास्त्रींनाही टीका सहन करावी लागली. इंदिरा गांधी यांचा तर लोकांनी पराभव केला. राजीव गांधी, नरसिंहराव आणि मनमोहन सिंग यांच्यावरही टीका झाली. पण मकोणीही जाहीर सभेत जाऊन रडले नाही. मत मागितले नाही. शिव्यांची यादी घेऊन गेले नाही. पण विद्यमान पंतप्रधान रडगाणे गात आहेत हे आश्चर्य आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
दरम्यान, राज्यातील सरकारला सत्तेची आणि पैशाची मस्ती आहे, अशी टीका करताना, उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख आहेत. उद्धव ठाकरे हे पक्षाचे प्रमुख असले तरी महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणूनच त्यांनी काम पाहिले. त्यामुळे पुढचा मुख्यमंत्रीही महाविकास आघाडीचाच होईल. आपआपल्या कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्यासाठी विधाने करावी लागतात, अशी कोपरखळी संजय राऊतांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून होत असलेल्या विधानाबाबत मारली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"