“राज्यात आता लाडका शेतकरी योजना लागू करा”; संजय राऊतांची मागणी, सरकारवर केली टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2024 07:58 PM2024-07-04T19:58:11+5:302024-07-04T19:59:26+5:30
Sanjay Raut News: राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अद्याप भाष्य केलेले नाही.
Sanjay Raut News: राज्यातील महाविकास आघाडीचे नेते शेतकरी मुद्द्यांवरून महायुती सरकारवर टीका करताना दिसत आहेत. राज्यातील शेतकरी आत्महत्या, पीकविमा कंपन्यांकडून केली जाणारी लूट यांवरून विरोधक सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत आहेत. यातच आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. हा धागा पकडून संजय राऊत यांनी राज्यात लाडका शेतकरी योजना लागू करा, अशी मागणी करत राज्य सरकारवर टीका केली आहे.
महाराष्ट्र सरकारने माझी लाडकी बहीण योजना आणली आहे. आता सरकारने माझा लाडका शेतकरी योजनाही आणावी. महाराष्ट्रात रोज १० शेतकरी महाराष्ट्रात आत्महत्या करत आहेत. जानेवारी महिन्यात राज्यात ३५० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्या होताना दिसत आहेत. यावर राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अद्याप भाष्य केलेले नाही. तुम्ही लाडकी बहीण योजना आणली, पण त्या बहिणीचा लाडका भाऊ आत्महत्या करत आहे. राज्यामध्ये यामुळे दुःखाचे सावट निर्माण झाले आहे, या शब्दांत संजय राऊत यांनी हल्लाबोल केला.
पीकविमा धोरण बदलून शेतकरी हिताचे धोरण बनवा
राज्यात मराठवाड्यासह विविध भागात दुष्काळ आहे, शेतकरी संकटात आहे असे असताना शेतकऱ्याला मदत मिळत नाही तर दुसरीकडे पिकविमा कंपन्या शेतकऱ्यांच्या जीवावर खिसे भरत आहेत. राज्यातील सरकार पीक विमा कंपन्यांबरोबर आहे, मोदींच्या मित्रोंबरोबर आहे. महसूल विभागाची वेबसाईट आजही बंद आहे, या बेवसाईटवर नोंद झाली नाही तर पीक विमा मिळत नाही. शेतकऱ्यांची लूट करणारे हे पीकविमा धोरण बदलून शेतकरी हिताचे धोरण बनवा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
दरम्यान, शेतकरी दुष्काळाचा सामना करत असतानाही शेतकऱ्यांना पिक विमा कंपन्यांकडून नुकसान भरपाई मिळत नाही. सरकार ऐकायला तयार नाही. महाराष्ट्रात रोज ४ शेतकरी आत्महत्या होत आहेत, अधिवेशन काळातही या आत्महत्या थांबलेल्या नाहीत. शेतकरी जगला तर देश जगेल म्हणूनच संकटातील शेतकऱ्याला आधार देण्यासाठी सरसकट कर्ज माफी जाहीर करावी अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे. पण या सरकारला शेतकऱ्यांचे हित साधायचे नाही, भाजपाप्रणित शिंदे सरकार हे शेतकरी विरोधी आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली.