“राज्य पोलिसांवर गृहमंत्र्यांना विश्वास नाही, म्हणूनच पवारांना केंद्राची सुरक्षा”: संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 12:30 PM2024-08-23T12:30:24+5:302024-08-23T12:34:10+5:30

Sanjay Raut News: तुमचे पोलीस आणि तुमची यंत्रणा कुचकामी आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने केला आहे, असे संजय राऊतांनी म्हटले आहे.

sanjay raut criticized state govt over z plus security provide to sharad pawar | “राज्य पोलिसांवर गृहमंत्र्यांना विश्वास नाही, म्हणूनच पवारांना केंद्राची सुरक्षा”: संजय राऊत

“राज्य पोलिसांवर गृहमंत्र्यांना विश्वास नाही, म्हणूनच पवारांना केंद्राची सुरक्षा”: संजय राऊत

Sanjay Raut News: ज्येष्ठ नेते शरद पवार यांना झेड प्लस श्रेणीची सुरक्षा देण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने केंद्रीय राखीव पोलिस दलाला याचे निर्देश दिले आहेत. यासाठी सीआरपीएफच्या ५५ सशस्त्र जवानांची टीम तैनात करण्यात आली आहे. सूत्रांनी सांगितले की, केंद्रीय एजन्सीने धोक्याबाबतची समीक्षा केल्यानंतर शरद पवार यांना मजबूत सुरक्षा देण्याची शिफारस केली होती. झेड प्लस ही सुरक्षेची सर्वोच्च श्रेणी आहे. शरद पवार यांना देण्यात आलेल्या सुरक्षेवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला.

पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी राज्य सरकारवर टीका केली. केंद्र सरकारने शरद पवार यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. ज्याची गरज नाही. याचा अर्थ महाराष्ट्रातील पोलिसांवर केंद्रीय गृहमंत्र्यांचा विश्वास नाही. शरद पवार यांच्यासारख्या नेत्याला केंद्रीय सुरक्षा द्यावी लागते विशेषतः अशावेळी जेव्हा महाराष्ट्रात त्यांचाच राज्य आहे, याचा अर्थ महाराष्ट्राचे पोलीस आमच्या मुलींचे रक्षण करू शकत नाही, त्याच पद्धतीने आमच्या प्रमुख नेत्यांचेही रक्षण करू शकत नाही. यावर आता केंद्र सरकारने शिक्कामोर्तब केले आहे, या शब्दांत संजय राऊतांनी हल्लाबोल केला. 

तुमचे पोलीस आणि तुमची यंत्रणा कुचकामी 

तुमचे पोलीस आणि तुमची यंत्रणा कुचकामी आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने केला आहे. राज्याच्या पोलीस महासंचालक या महिला आहेत, त्या जाहीरपणे सांगत असतील की, मी संघाची कार्यकर्ता आहे तर अशा व्यक्तीकडून तुम्ही काय अपेक्षा करू शकता? या राज्यातील अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या नेमणूक झाल्या आहेत, त्यांची पार्श्वभूमी संघ परिवाराशी संबंधित आहे का? हे बघूनच त्यांना वरिष्ठ पदावर नेमणूक देण्यात आली आहे. त्यामुळे इतर पोलीस अधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे. राज्यातील पोलीस खाते हे भ्रष्टाचाराने बरबटलेले आहे. कारण पैसे दिल्याशिवाय बढती आणि भरती होत नाही, असा गंभीर आरोप संजय राऊतांनी केला आहे. 

दरम्यान, मला काही माहिती नाही. गृहखात्याचे अधिकारी माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितले की, तीन लोकांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ती तिघे जण म्हणजे मी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह. मला सुरक्षा कशासाठी दिली ते माहिती नाही. पण निवडणुका डोळ्यासमोर आहेत, म्हणून सुरक्षा दिली असावी. माझ्या दौऱ्याची खात्रीलायक माहिती मिळवण्याची व्यवस्था असू शकते, अशी शंका शरद पवार यांनी झेड प्लस सुरक्षेसंदर्भात प्रतिक्रिया देताना उपस्थित केली.
 

Web Title: sanjay raut criticized state govt over z plus security provide to sharad pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.