संजय राऊतांचा भाजपावर घणाघात; इंडियाऐवजी भारत नाव करण्यावरून सुनावले खडे बोल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2023 11:36 AM2023-09-06T11:36:23+5:302023-09-06T11:55:20+5:30
सरकारने अचानक विशेष अधिवेशन का बोलावले? अजेंडा काय आहे? सरकारने फक्त निमंत्रण दिलंय, ही पार्टी आहे का? असा सवालही राऊतांनी विचारला आहे.
मुंबई - आम्ही इंडिया नाव दिल्याने देशाच्या नावाची भीती वाटते, तुम्ही काय काय बदलणार आहात? भारत हाच इंडिया आहे. संविधान बदलण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला? तुम्हाला नवी भारत बनवायचा आहे तर रिपब्लिक ऑफ भारत करा. या देशातील जनता हे मंजूर करणार नाही अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपा आणि केंद्र सरकारवर घणाघात केला आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले की, एक देश, एक निवडणूक हा फ्रॉड आहे. राजकीय स्वार्थासाठी असे फ्रॉड करण्यात आलेत. देश लुटण्याचे, खड्ड्यात घालण्याचे अजून एक फ्रॉड आहे. इंडिया आघाडी स्थापन केल्यापासून त्यांना इंडिया शब्दाची भीती वाटते. घटनेतील नावाविषयी भय वाटू लागते हा विचित्र प्रकार आहे. भारत, इंडिया हे घटनेतील नाव आहे. इंडियाचे नामोनिशान मिटवण्याचा डरपोकपणा, क्रूर, विकृतपणा आहे. रिपब्लिक ऑफ भारत करा, तुम्ही चंद्रयानात बसून काम करताय का? इंडिया आहे, इंडिया राहील आणि सत्तेवर इंडिया येईल असा दावा त्यांनी केला.
विशेष अधिवेशन कशासाठी?
सरकारने अचानक विशेष अधिवेशन का बोलावले? अजेंडा काय आहे? सरकारने फक्त निमंत्रण दिलंय, ही पार्टी आहे का? तमाशा आहे का? कसलं निमंत्रण आहे? भाजपाचा निरोप समारंभ आहे का? कुठल्याही अजेंड्याशिवाय, कार्यक्रमाशिवाय सरकार विशेष अधिवेशन बोलावते हे काय चाललंय देशात असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. मणिपूर हिंसाचार, महागाई, बेरोजगारी, चीनची घुसखोरी यासारखे अनेक प्रश्न आहेत. अधिवेशनाचं निमंत्रण आलंय पण कशासाठी जायचे हेच माहिती नाही असा आरोपही राऊतांनी केला.
त्याचसोबत सोनिया गांधी यांना विरोधकांच्या बैठकीचे अधिकार दिले आहेत. सोनिया गांधी पंतप्रधानांना पत्र लिहणार आहे. देशभरातील खासदारांना एकत्रित का बोलावताय हे कळू द्या, ही कोणती हुकुमशाही आहे. संसदेच्या अधिवेशनाचा विषय सांगितला नाही ही कोणती गोपनीयता आहे. तुम्ही कार्यक्रम कशाला लपवताय? तुम्ही संसदेच्या अधिवेशनाचा अजेंडा सांगितला जात नाही. आम्हाला अधिवेशनात काही प्रश्न मांडायचे आहेत ते मांडू शकतो की नाही. महाराष्ट्रात मराठा आरक्षण मुद्दा पेटला आहे. आम्हाला त्यावर आवाज उठवायचा आहे. राज्यात दुष्काळ आहे ते प्रश्न मांडू शकतो की नाही हे सरकारने सांगावे अशी मागणी राऊतांनी केली.
१० वर्षात देश एक इंचही पुढे गेला नाही
मुंबई जी-२० चा कार्यक्रम केला होता, तेव्हा मुंबईतही अनेक ठिकाणी गरिबी दिसू नये म्हणून पडदे लावले होते. तुम्हाला झाकावं लागतंय, कारण लोकं वाकून बघताय, गेल्या १० वर्षात देश एक इंचही पुढे गेला नाही. तीच महागाई, तीच गरिबी, तीच बेरोजगारी, तोच भ्रष्टाचार, तुम्ही किती लपवणार आहे. फक्त इंडियाचे नाव बदलून ही लपवालपवी चालणार नाही असंही राऊतांनी भाजपाला सुनावले. त्याचसोबत मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारकडे तोडगा नाही. केंद्र सरकारने घटनादुरुस्ती करावी, त्यानंतरच मराठा, धनगर आरक्षणाचा प्रश्न मिटेल. केंद्राने विशेष कायदा करावा आम्ही त्यांच्या पाठिशी उभे राहू असं म्हटलं आहे.