बाप रे! संपूर्ण दिल्ली देशद्रोही; सामनातून भाजपवर टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2020 01:42 PM2020-02-16T13:42:11+5:302020-02-16T13:43:00+5:30
दिल्ली विधानसभा निकालाने एक दाखवून दिले, पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहा हे अजिंक्य नाहीत.
मुंबई : दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या अपयशावरून शिवसनेचे खासदार संजय राऊत यांनी सामनातून भाजपवर निशाणा साधला आहे. राममंदिर, 370 कलम, कश्मीर, सर्जिकल स्ट्राइक, हिंदुत्व हे सर्व विषय भाजपने जोरात लावून धरले, पण शेवटी जीवनावश्यक गोष्टी, पोटापाण्याचे विषय महत्त्वाचे ठरले व लोकांनी केजरीवाल यांना उचलून डोक्यावर घेतले. जे भाजपला मतदान करणार नाहीत ते देशद्रोही असे भाजपचे प्रचारक सांगत होते. दिल्ली ही देशाची राजधानी. दिल्लीने भाजपच्या विरोधात मतदान केले. आता संपूर्ण दिल्लीला देशद्रोही ठरवणार काय? असा टोला संजय राऊत यांनी सामनातून भाजपला लगावला.
दिल्ली विधानसभा निकालाने एक दाखवून दिले, पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहा हे अजिंक्य नाहीत. दुसरे म्हणजे मतदार बेइमान नाहीत. धर्माच्या वावटळी निर्माण केल्या जातात, त्यात ते वाहून जात नाहीत. राम हा श्रद्धेचा विजय आहेच, पण काही विजय हनुमानही मिळवून देतो. दिल्लीत तसेच झाले. त्यामुळे मोदी, शहा यांच्यामुळेच निवडणुका जिंकता येतात या दंतकथांतून लोकांनी आता तरी बाहेर पडायला हवे, असे राऊत म्हणाले.
दिल्ली विधानसभा मतदानात ‘नौका’ डुबते आहे याची खात्री पटताच भाजपने हुकमी एक्का बाहेर काढला. प्रभू श्रीरामालाच थेट प्रचारात उतरवले. संसदेचे अधिवेशन सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामजन्मभूमी ट्रस्टची घोषणा करून राममंदिराच्या कार्यास प्रारंभ होत असल्याचे जाहीर करून टाकले. पण राममंदिराच्या घोषणेचा कोणताही ‘करंट’ दिल्ली विधानसभेत लागला नाही. केजरीवाल हनुमानभक्त. हनुमानाच्या छातीत राम. राम सरळ हनुमानाच्या मागे उभा राहिला. त्यामुळे जनता राम व केजरीवाल हनुमान असं चित्र दिल्लीत दिसलं, असेही राऊत म्हणाले.