Sanjay Raut ED Action: संजय राऊतांना कोणत्याही क्षणी ईडी ताब्यात घेणार; पोलिसांचा मोठा फौजफाटा, शिवसैनिक जमण्यास सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2022 10:17 AM2022-07-31T10:17:35+5:302022-07-31T10:19:04+5:30
पत्रा चाळ प्रकरणी राऊत यांना गेल्या काही काळापासून ईडी समन्स बजावत होती. यावर राऊत वेगवेगळी कारणे देत चौकशी टाळत होते.
गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी सकाळी सकाळीच ईडीचे अधिकारी पोहोचले आहेत. संजय राऊत आणि त्यांची पत्नी यांची चौकशी सुरु आहे. राऊत यांच्या घराबाहेर पोलिसांचा फौजफाटा वाढू लागला असून शिवसेनेचे कार्यकर्तेदेखील जमू लागले आहेत.
पत्रा चाळ प्रकरणी राऊत यांना गेल्या काही काळापासून ईडी समन्स बजावत होती. यावर राऊत वेगवेगळी कारणे देत चौकशी टाळत होते. यापूर्वी २० जुलैला नंतर २७ जुलैला ईडीने समन्य बजावले होते. परंतू राऊत यांनी लोकसभा अधिवेशन सुरु असल्याने उपस्थित राहू शकत नाही, असे ईडीला कळविले होते. शनिवारी राऊत मुंबईत आले आणि ईडीने रविवारी सकाळीच राऊतांच्या घरी हजेरी लावली.
राऊत यांच्यावर कारवाई करण्यासाठी ईडीचे १० अधिकारी आणि दोन कर्मचारी आहेत. या अधिकाऱ्यांच्या तीन टीम बनविण्यात आल्या आहेत. पश्चिम उपनगरात, दुसरी मध्य मुंबईतील कार्यालयात पोहोचली आहे. ईडीने आपल्यासोबत मोठा पोलीस फौजफाटा बोलविला आहे. ईडीच्या एका अधिकाऱ्यांने मराठी वृत्तवाहिनीला राऊतांना ईडी कार्यालयात घेऊन जाणार असल्याचे सांगितले.
साक्षीदार महिलेला बलात्काराच्या धमक्या...
महाराष्ट्रातील आधीच्या नेत्यांवरील ईडीची कारवाई पाहता, ईडी आधी ताब्यात घेते नंतर अटक करते. ईडीकडून तपास सुरू असलेल्या पत्रा चाळ पुनर्विकास घोटाळा प्रकरणातील साक्षीदाराने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात दिलेला जबाब मागे घेण्याच्या धमक्या मिळाल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अदखलपात्र नोंद करत तपास सुरू केला आहे.
साक्षीदार महिलेने वाकोला पोलीस ठाण्यात लेखी तक्रार अर्ज दाखल केला आहे. बलात्कार तसेच जीवे मारण्याची धमकी त्यांना दिल्याचा आरोप महिलेने तक्रारीत केला आहे. ईडीने गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड, मुंबईचे माजी संचालक प्रवीण एम राऊत यांच्याकडे पालघर, सफाळे, पडघा येथील जमीन, संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांचा दादर येथील फ्लॅट आणि किहीम येथील भूखंड या मालमत्ता जप्त केल्या.