Sanjay Raut ED Action: 'पापाचा घडा भरला, संजय राऊतांना अटक होणार', खासदार नवनीत राणांचे टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2022 01:23 PM2022-07-31T13:23:30+5:302022-07-31T13:23:43+5:30
Sanjay Raut ED Action:'एका पत्रकाराकडे एवढी संपत्ती आली कुठून? गोरगरीबांचे पैसे उकळून राऊतांनी संपत्ती बनवली.'
Sanjay Raut ED Action: पत्राचाळ घोटाळाप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत(Sanjay Raut) यांना ईडीने समन्स बजावली होती. पण, अनेकवेळा राऊत यांनी चौकशी टाळली. पण, आज अखेर ईडीने संजय राऊतांच्या घरी हजेरी लावली. राऊत यांच्या निवासस्थानी सकाळी सकाळीच ईडीचे अधिकारी पोहोचले आणि संजय राऊत आणि त्यांची पत्नी यांची चौकशी सुरु आहे. दरम्यान, या प्रकरणावर खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पापाचा घडा भरला की तो फुटतोच
मीडियाशा बोलताना खासदार राणा म्हणाल्या की, 'पापाचा घडा भरला की तो फुटतोच. गोरगरीबांचे पैसे उकळून संजय राऊत यांनी आपली संपत्ती बनवली आहे. एका पत्रकाराकडे एवढी संपत्ती आली कुठून?,' असा प्रश्न नवनीत राणा यांनी उपस्थित केला आहे. तसेच, 'भ्रष्टाचारी संजय राऊत यांच्याविरोधात महाराष्ट्रातील जनता एकत्र लढेल', अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
राऊतांना अटक होणार
त्या पुढे म्हणाल्या की, 'संजय राऊत यांना अटक होणार आहे. संजय राऊत हे 25 कंपनीत भागीदार आहेत. ही कारवाई यापूर्वीच व्हायला पाहिजे होती.' असा टोलाही त्यांन यावेळी लगावला. दरम्यान, शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनीदेखील राऊत यांच्यावर टीका केली. 'जैसी करणी वैसी भरणी, यामुळे या कारवाईतून कोणाची सुटका नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई पाहता संजय राऊत यांना अटक होऊ शकते', असा दावा शिरसाट यांनी केला आहे.
राऊतांवरील ईडीच्या कारवाईचा आणि भाजपाचा काहीच संबंध नाही
संजय राऊत यांच्या कारवाईवर केंद्रीय मंत्री भागवत कराड (Bhagwat Karad) यांनीदेखील प्रतिक्रिया दिली. 'संजय राऊत यांनी काही चूक केली नसेल तर त्यांनी घाबरण्याचे काही कारण नाही. संजय राऊत यांची चौकशी आणि ईडी याच्याशी भाजपचा काहीही संबंध नाही, जे कोणी शिवसेनेचे नेते भाजपवर आरोप करत असतील ते चुकीचे आहेत, त्यांच्या आरोपांचे मी खंडन करतो,' असे कराड म्हणाले.