संजय राऊत वि. नारायण राणे वाद वाढणार; राऊतांकडून अब्रुनुकसानीचा दावा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2023 02:14 PM2023-04-21T14:14:10+5:302023-04-21T14:14:43+5:30
नारायण राणे यांनी भांडूपमध्ये संजय राऊतांवरून केलेल्या वक्तव्याविरोधात हा दावा दाखल करण्यात आला आहे.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेना गटाचे नेते, राज्यसभा खासदार संजय राऊत आणि भाजपाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यातील वाद वाढण्याची चिन्हे आहेत. एकीकडे हे दोन्ही नेते एकमेकांना पाहून घेत नसताना राऊतांनी राणेंवर अब्रुनुकसानीचा दावा दाखल केल्याने राजकारण तापण्याची चिन्हे आहेत.
नारायण राणे यांनी भांडूपमध्ये संजय राऊतांवरून केलेल्या वक्तव्याविरोधात हा दावा दाखल करण्यात आला आहे. आपण शिवसेनेत असताना संजय राऊत यांना राज्यसभेत निवडून आणण्यासाठी खर्च केला होता. संजय राऊत यांचे मतदार यादीत नावही नव्हते, असे वक्तव्य राणे यांनी भांडूपमध्ये केले होते.
याविरोधात राऊत यांनी फेब्रुवारी महिन्यात राणेंना नोटीस पाठविली होती. राणे यांनी पुराव्यानिशी हे दावे सिद्ध करावेत, असे यात म्हटले होते. राणे यांच्याकडून या नोटीशीला उत्तर देण्यात आले नाही. यामुळे राऊत यांनी मुलुंडच्या न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.
दुसरीकडे राऊत आणि अजित पवार यांच्यातील कलगीतुरा देखील रंगला आहे. अजित पवार यांनी कोण संजय राऊत असे वक्तव्य केले आहे. यावरूनही ठिणगी पडण्याची शक्यता आहे. शरद पवार यांची आणि माझी नक्कीच भेट झाली. नक्कीच राजकीय चर्चा होणार राजकारणातील दोन व्यक्ती एकत्र आले तर चर्चा तर होणारच तुम्हाला कळेल येत्या दिवसात नेमकी काय चर्चा झाली ते, असे सुतोवाच राऊत यांनी केले आहे.