संजय राऊतांनी धनुष्यबाणाची आशा सोडली? म्हणाले ठाकरेंच्या शिवसेनेचे चिन्ह आता मशालच, याच चिन्हावर...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2024 11:26 AM2024-08-02T11:26:02+5:302024-08-02T11:26:34+5:30
Sanjay Raut PC: संसद, राम मंदिर बांधण्यामागे मोठी मोठी नावे, टाटा, एलअँडटी पण ठेकेदार कोण होते? कोणत्या राज्यांचे प्रभावी होते, हिशोब झाला पाहिजे... संजय राऊतांचा आरोप.
नवीन संसद बांधून एक वर्षही झालेले नाही तर पाणी गळत आहे. राम मंदिरात जिथे रामलल्ला विराजमान आहे तिथे गळती आहे. ज्या ठेकेदारांना काम दिले आहे त्याचा हिशोब परत झाला पाहिजे. हे सर्व ठेकेदार कोण आहेत. मोठी मोठी नावे घेतली जात आहेत. संसद टाटाने बांधली, राम मंदिर लार्सन टूब्रोने बांधली, पण येथे ठेकेदार कोण होते ते कोणत्या राज्याचे प्रभावी होते हे एकदा समोर आले पाहिजे, असा घणाघात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर केला आहे.
याचबरोबर राज्यातील लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना राऊतांनी या योजनेतून महिलांना दोन महिनेच पैसे मिळतील, असा दावा केला आहे. लाडक्या बहीण योजनेतील फसवणूक ही की निवडणुकीचे दोन महिने आहेत. त्यानंतर लाडक्या बहिणीला काही मिळणार नाही. त्या लाडक्या बहीणची काळजी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांनाच घ्यावी लागणार आहे, असे राऊत म्हणाले.
एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील अजित पवार असतील यांना लाडक्या बहिणीचा जो उमाळा आलेला आहे. हा निवडणुका पुरता आला आहे. दोन महिने त्यांच्या खात्यात पैसे टाकतील महाराष्ट्रात कर्जाचा डोंगर करतील आणि मग त्यानंतर पळून जातील, अशी टीका राऊत यांनी महायुती सरकारवर केली आहे.
शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही मशाल चिन्हावरच महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या सर्व निवडणुका लढवणार आहे. या मशाल चिन्हाने महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या खुर्चीला आग लावली आहे. मशाल असेल तुतारी वाजवणारा माणूस असेल ही आमची चिन्ह आहेत. आणि काँग्रेसचा हात आहे असे आम्ही एकत्र निवडणुका लढू. पण शिवसेनेचे चिन्ह हे आता धनुष्यबाण नसून मशाल आहे. आणि धनुष्यबाण हे चोरांच्या हातामध्ये आहे, असे राऊत म्हणाले. लोकसभेत काही चोऱ्या केल्या धनुष्यबाणाच्या नावाखाली पण विधानसभेला ते जमणार नाही, असेही राऊत म्हणाले.
राहुल गांधींवरील ईडी कारवाईच्या शक्यतेवरही राऊत यांनी मत मांडले आहे. आता इतक सोपे नाही आहे, विरोधी पक्ष फार मजबूत आहे. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर, घटनाबाह्य काम करण्याची व्यसन काही सुटत नाहीय. ज्या पद्धतीने गेल्या एक महिन्यापासून सरकार वरती हल्ला करत आहेत सरकारला आरसा दाखवत आहेत मोदी आणि शहा यांना सळो की पळो करून सोडत आहेत, त्याच्यामुळे राहुल गांधी असतील आम्ही सगळे असलो तरी आम्हाला पुन्हा एकदा कारवाईला सामोरे जावे लागेल आमची तयारी आहे, असे राऊत म्हणाले.