संजय राऊतांचं वादग्रस्त वक्तव्य, जीभ घसरली; औरंगजेबासोबत केली पंतप्रधान मोदींची तुलना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2024 08:48 AM2024-03-21T08:48:02+5:302024-03-21T08:48:53+5:30

"महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले आणि औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला. गुजरातमध्ये जेथे मोदी जन्माला आले, त्याच्या बाजूला दाहोद नावाचे गाव आहे. तेथे औरंगजेब जन्माला आला. म्हणून ही औरंगजेबी वृत्ती गुजरात आणि दिल्लीतून महाराष्ट्रावर चाल करून येत आहे."

Sanjay Raut got angry, compared PM narendra Modi with Aurangzeb | संजय राऊतांचं वादग्रस्त वक्तव्य, जीभ घसरली; औरंगजेबासोबत केली पंतप्रधान मोदींची तुलना

संजय राऊतांचं वादग्रस्त वक्तव्य, जीभ घसरली; औरंगजेबासोबत केली पंतप्रधान मोदींची तुलना

गुजरातमध्ये जेथे मोदी जन्माला आले, त्याच्या बाजूला दाहोद नावाचे गाव आहे. तेथे औरंगजेब जन्माला आला. म्हणून ही औरंगजेबी वृत्ती गुजरात आणि दिल्लीतून या महाराष्ट्रावर चाल करून येत आहे, असे म्हणत पंतप्रधान नरेद्र मोदी यांना औरंगजेब म्हणा,  असे वादग्रस्त वक्तव्य शिवसेना (उद्धव ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी केले आहे. ते बुलढाणा येथे शिवसेनेच्या मोळाव्यात बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, "महाराष्ट्र यासाठी मोठा आहे, कारण या मातीत छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले, यामुळे या महाराष्ट्राला इतिहास आहे. आणि आज जे महाराष्ट्रावर चाल करून येत आहेत. ते गुजरातचे राज्यकर्ते मोदी असतील किंवा शाह असतील. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले आणि औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला. गुजरातमध्ये जेथे मोदी जन्माला आले, त्याच्या बाजूला दाहोद नावाचे गाव आहे. तेथे औरंगजेब जन्माला आला. म्हणून ही औरंगजेबी वृत्ती गुजरात आणि दिल्लीतून महाराष्ट्रावर चाल करून येत आहे. शिवसेनेच्या विरोधात आणि आमच्या स्वाभिमानाच्या विरोधात." 

यावेळी, समोरील कार्यकर्त्यांमधून एकेरी नावाने 'मोदी आला मोदी, अशी हाक आली. यावर, मोदी आला नाही, 'औरंगजेब आला म्हणा', असे राऊतांनी म्हटले आहे. 

"हा इतिहास सांगण्याचे कारण म्हणजे, या राज्यात शिवाजी महाराज जन्मले आणि बाजूच्या राज्यात औरंगजेब जन्माला आला. पण जे-जे या महाराट्रावर चाल करून आले, ज्यांनी ज्यांनी या महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर या राज्यातल्या हिंदवी स्वराज्यावर हल्ले करण्याचा प्रयत्न केला, ते औरंगजेब असेल, शाहिस्ता खान असेल, अफजल खान असेल, त्या सर्वांना याच मातीत गाडण्याचं काम इतिहास झालेले आहे. त्यामुळे आताही त्या विचाराने या महाराष्ट्रावर हल्ले करणार असतील, तर हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने स्थापन झालेली शिवसेना, त्या शिवसेनेचे निर्माते बाळासाहेब ठाकरे आहेत आणि ती शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पुढे घेऊन चाललो आहोत," असेही संजय राऊत म्हणाले. 

राऊत पुढे म्हणाले, "याद राखा, महाराष्ट्रावर चाल करून येण्याचा प्रयत्न करू नका. हा महाराष्ट्र संपवण्याचे कारस्थान सुरू आहे. शिवसेनेवर हल्ला केला, शिवसेनेचे दोन तुकडे केले, ते यासाठी केले, कारण त्यांना या महाराष्ट्रात स्वाभिमानी मराठी मानसाला संपवायचे आहे. हा महाराष्ट्र विकायचा आहे. मुंबई विकायची आहे आणि उद्योगपतींच्या घषात घालायची आहे. हे आपल्याला होऊ द्यायचे नाही." एवढेच नाही, तर जोवर शिवसेना आहे, तोपर्यंत शिवरायांचे हिंदवी स्वराज्याचे स्वप्न शिवसेने पुढे घेऊन जाईल आणि ते हिंदवी स्वराज्याचे स्वप्न तोडण्यासाठी आधी शिवससेना तोडली पाहीजे, मग महाराष्ट्र तोडू मग मुंबई तोडू, अशा प्रकारचं कारस्थान या दिल्ली आणि गुजरातच्या लोकांनी केलंय. त्यांना तोंड देऊन संघर्ष करून त्यांना मागे हटवायचे आहे, असेही राऊत यांनी म्हटले आहे. 


 

Web Title: Sanjay Raut got angry, compared PM narendra Modi with Aurangzeb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.