Sanjay Raut vs Gopichand Padalkar: "संजय राऊत 'झिंग झिंग झिंगाट' झालेत"; गोपीचंद पडळकरांनी केली बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2022 12:47 PM2022-01-29T12:47:22+5:302022-01-29T12:58:28+5:30
"महाराष्ट्राच्या तरूण पिढीला नशेत ढकलण्याची भूमिका शरद पवार कधीही घेणार नाहीत"
महाविकास आघाडी सरकारने नुकताच एक निर्णय घेतला. त्यावरून राज्यभरात वाद सुरू आहे. वाईन विक्रीतून मिळणारा महसूल वाढविण्याच्या दृष्टीकोनातून राज्य सरकारने राज्यातील किराणा दुकानं आणि सुपर मार्केटमध्येही वाईन विक्रीसाठी मंजुरी दिली. जे सुपर मार्केट १ हजार स्वेअर फुटांपेक्षा मोठं आहे, तिथे एक वेगळा स्टॉल टाकून वाईन विक्रीला सरकारने मुभा दिली आहे. राज्य सरकाराच्या निर्णयावर भाजपाने टीका केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मात्र या निर्णयाचं समर्थन केलं आहे. त्याच मुद्द्यावरून भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राऊतांवर बोचरी टीका केली.
जनाब @rautsanjay61 झिंग झिंग झिंगाट झाले आहेत.मा.@PawarSpeaks नावाचा वापर करून ते #वाईन विक्रीचं समर्थन करतायत.जे #पवारांनी आयुष्यात सोसलं आहे,त्याची खंतही जाहीरपणे व्यक्त केली आहे,त्यामुळेच ते महाराष्ट्राच्या युवा पिढीला नशेत ढकलण्याची भूमिका कधीही घेणार नाहीत.@BJP4Maharashtrapic.twitter.com/Q6RjnksZXp
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) January 29, 2022
"जनाब संजय राऊत हे देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांमुळे पुरते बावचळले आहेत. या भितीपोटी की परदेशात वाईन मालकांसोबत झालेल्या बैठकीबाबत फडणवीस खुलासा करतील. त्यामुळेच संजय राऊत 'झिंग झिंग झिंगाट' झाले आहेत. जर खरोखरच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांबद्दल तुम्ही हे धोरण राबवत असाल तर हे नमूद करणार का, की महाराष्ट्रात निर्माण झालेल्या वाईनलाच विक्रीची परवानगी असणार असून परदेशात झालेल्या बैठकीतील कंपन्यांना परवानगी नसेल", असा सवाल पडळकरांनी महाविकास आघाडी आणि संजय राऊतांना केला.
"जे आजपर्यंत कधी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना भोगावं लागले नव्हतं ते महाविकास आघाडीच्या काळात शेतकऱ्यांना भोगावं लागलं. गावच्या गाव अंधारात लोटली गेली. ऐन कापणीच्या हंगामात वीज तोडली गेली. त्यांच्यावर बळाचा वापर करण्यात आला", असा आरोप त्यांनी केला.
महाराष्ट्राच्या तरूण पिढीला नशेत ढकलण्याची भूमिका शरद पवार कधीही घेणार नाहीत!
"शरदचंद्र पवारांच्या नावाचा वापर करून आपण विक्रीचं समर्थन करताय. मला खात्री आहे की जे पवारांनी आयुष्यात सोसलं आणि त्याची त्यांनी खंतही जाहीरपणे व्यक्त केलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या तरूण पिढीला नशेत ढकलण्याची भूमिका शरद पवार कधीही घेणार नाहीत", असा विश्वासही पडळकरांनी व्यक्त केला.