Maharashtra Election 2024: "अमित शाहांनी खोटं बोलणं बंद करावं"; संजय राऊतांनी डिवचलं, काय बोलले?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 11:09 AM2024-11-11T11:09:38+5:302024-11-11T11:12:22+5:30
Sanjay Raut Amit Shah : ३७० कलम मुद्द्यावरून अमित शाहांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला लक्ष्य केले. त्याला संजय राऊतांनी उत्तर दिले.
Sanjay Raut Amit Shah News: "अमित शाहांनी ४०-४० आमदार विकत घेतले असतील. अमित शाहांनी महाराष्ट्राची १४ कोटी जनता विकत घेतलेली नाही", असे म्हणत शिवसेनेचे (यूबीटी) खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना डिवचले. ३७० कलम मुद्द्यावरून अमित शाहांनी ठाकरेंना घेरलं. त्यावरून राऊतांनी शाहांना उलट सवाल केला आहे.
खासदार संजय राऊत यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यावर भाष्य केले.
"मुख्यमंत्री कोण हे अमित शाह ठरवू शकत नाही"
निकालानंतर आम्ही तिघे एकत्र बसू आणि मग ठरवू की मुख्यमंत्री कोण?, असे अमित शाह म्हणालेले. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, "अमित शाह हे ठरवू शकत नाही. या राज्याची जनता ठरवेल. अमित शाहांनी ४०-४० आमदार विकत घेतले असतील. अमित शाहांनी महाराष्ट्राची १४ कोटी जनता विकत घेतलेली नाही. अमित शाह या महाराष्ट्राचे नेते नाहीत. अमित शाह गुजरातचेही नेते नाहीत, ते देशाचे नेते कधीच होऊ शकत नाही. त्यांच्या हातात पोलीस, ईडी आहे, तोपर्यंत ते राज्यात दहशत निर्माण करू शकतात", अशी टीका राऊतांनी केली.
ज्यांनी ३७० कलम हटवण्याला विरोध केला, त्या काँग्रेसच्या शेजारी उद्धव ठाकरे बसले आहेत, अशी टीका अमित शाहांनी प्रचारसभेतून केली. त्याला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, "अमित शाह खोटं बोलताहेत. व्यापारी नेहमी खोटं बोलतो, आपल्या फायद्यासाठी. दुकानदार जो असतो, हा आपल्या फायद्यासाठी एकतर भेसळ करतो किंवा खोटं बोलतो. ग्राहकाला फसवतो. ३७० कलमाला कोणी विरोध केलेला नाही. ३७० कलमाला शिवसेनेने विरोध केला नाही किंबहुना पाठिंबाच दिला", असे संजय राऊत म्हणाले.
अमित शाहांनी बडबडणे बंद करावे -संजय राऊत
"३७० कलम हटवून आपण काश्मिरमध्ये काय दिवे लावले? हे सांगा म्हणा. आज काश्मिरमध्ये जवानांच्या हत्या सुरू आहेत. अतिरेक्यांचे हल्ले सुरू आहेत. काश्मिरी पंडितांची घरवापसी होणार होती, एकही काश्मिरी पंडीत तुम्ही त्यांच्या घरी सुरक्षितपणे त्यांच्या घरी पाठवू शकला नाहीत. त्यामुळे अमित शाहांनी यावर बडबडणे बंद करावे", अशी टीका संजय राऊत यांनी केली.