संजय राऊत अडचणीत? सहा आमदारांची नावे फोडणे हा आचारसंहितेचा भंग; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2022 11:24 AM2022-06-12T11:24:16+5:302022-06-12T11:24:42+5:30
Kirit Somaiya on Sanjay Raut Rajya sabha Election: अपक्षांनी दगा दिल्याचा आरोप संजय राऊत यांनी राज्यसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर केला होता. शिवसेनेचा सहाव्या जागेसाठीचा उमेदवार पडला होता. यावर राऊत यांनी अपक्ष आमदारांवर याचे खापर फोडले होते.
शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी राज्यसभा निवडणुकीवेळी आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. याचबरोबर आपण याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे, असा इशाराही दिला आहे.
अपक्षांनी दगा दिल्याचा आरोप संजय राऊत यांनी राज्यसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर केला होता. शिवसेनेचा सहाव्या जागेसाठीचा उमेदवार पडला होता. यावर राऊत यांनी अपक्ष आमदारांवर याचे खापर फोडले होते. यावेळी त्यांनी सहा आमदारांचे नाव घेतले होते. यावर किरीट सोमय्या यांनी आक्षेप घेतला आहे.
शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी आणि काँग्रेस किंवा अन्य पक्षाच्या आमदारांना व्हीप जारी करण्यात आला होता. ते अधिकृत पक्षाचे आमदार असल्याने राज्यसभेला मतदान करताना पक्षाच्या प्रतोदाला मताची चिठ्ठी दाखवून ते द्यावे लागते. परंतू अपक्षांना कोणीही विचारू शकत नाही. त्यांनी कोणाला मतदान केले हे कोणीही सांगू शकत नाही. असे असताना अपक्ष आमदारांनी कोणाला मत दिले हे संजय राऊत कसे सांगू शकतात. त्यांनी आचारसंहितेचा भंग केला आहे, असा आरोप सोमय्या यांनी केला आहे.
उद्धव ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत. त्याचबरोबर ते मुख्यमंत्री देखील आहेत. यामुळे त्यांना उत्तर द्यावे लागणार. या आमदारांची मते फुटली कशी? या आमदारांची नावे घेण्यामागचा उद्देश काय? या आमदारांना धमकावण्यासाठी हे सारे सुरु आहे का, असा सवाल सोमय्या यांनी उपस्थित केला.