उद्धव ठाकरेंना CM पदाचा चेहरा करण्यासाठी उद्धवसेना आग्रही; काँग्रेस-NCP ची सावध भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 10:43 AM2024-06-27T10:43:52+5:302024-06-27T10:44:20+5:30
महाविकास आघाडीनं निवडणुकीला सामोरे जाताना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा दिला पाहिजे अशी भूमिका घेत संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंचं नाव पुढे केले आहे.
मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महाविकास आघाडीने तयारीला सुरुवात केली आहे. परंतु मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरून सध्या तिन्ही पक्षात एकमत होताना दिसत नाही. उद्धव ठाकरेंकडे पाहून लोकांनी लोकसभेला मतदान केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा द्यावा लागेल, चेहऱ्याशिवाय निवडणुकीला सामोरं जाणं धोक्याचे असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. त्यावर काँग्रेस राष्ट्रवादीने सावध भूमिका घेतली आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरेंचं काम लोकांनी पाहिले आहे. लोकसभेला समाजातील अनेक घटकांचे मतदान उद्धव ठाकरेंकडे पाहून झालेले आहे. तिघांची ताकद एकत्र होती पण बिनचेहऱ्याची महाविकास आघाडी आणि बिनचेहऱ्याचं सरकार अजिबात चालणार नाही. लोक स्वीकारणार नाही. लोकांना चेहरा द्यावाच लागेल असं विधान त्यांनी केले आहे.
तर आम्ही आज एकत्रित आहोत, एकत्र राहणार आहोत आणि महाविकास आघाडी म्हणूनच विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. मुख्यमंत्री कोण यावर आम्ही चर्चा करत नाही. महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही निवडणूक लढवणार आहोत असं सांगत उद्धव ठाकरेंच्या CM पदाच्या चेहऱ्यावर भाष्य करणं काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी टाळलं.
दरम्यान, मुख्यमंत्री कोण व्हावा याच्यात मविआच्या कुठल्याही नेत्याने स्वारस्य ठेवू नये. आम्ही सत्तेवर आले पाहिजे हे स्वारस्य ठेवले पाहिजे. मविआत निवडून आलेले आमदार कोण मुख्यमंत्री हे ठरवतील. महाविकास आघाडीतील कुठल्याही पक्षातील नेत्याने मुख्यमंत्री कोण होणार अशी भाषा करणे टाळले पाहिजे असं शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
संजय राऊतांना शिवसेनेचा टोला
संजय राऊत कधी काही बोलतील सांगता येत नाही. मागे निवडणुकीत पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून उद्धव ठाकरेंचं नाव पुढे केल्याचं आठवत असेल. आजच्या घडीला काँग्रेस दुसऱ्या चेहऱ्याला पुढे येऊ देणार नाही हे निश्चित आहे. उद्धव ठाकरेंचं नाव पुढे यावं ही राऊतांची मागणी त्यांच्या पक्षापुरती मर्यादित आहे. परंतु आघाडीत शरद पवार आणि इतर काँग्रेस नेते हे मान्य करतील असं वाटत नाही. म्हणून आघाडीत काडी लावण्याचा प्रकार संजय राऊतांनी सुरू केला आहे असा टोला शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी राऊतांना लगावला आहे.
तसेच जर उद्धव ठाकरेंकडे पाहून लोकांनी मतदान केले असा दावा संजय राऊतांचा असेल तर काँग्रेस १ वरून १३ वर जाते आणि तुम्ही १८ वरून ९ वर कसे येता? हा प्रश्न उपस्थित होतो. तुमचा स्ट्राईक रेट आणि संख्याबळ हे कुठेही वाढताना दिसत नाही. त्यामुळे आघाडीत पाहिले तर सर्वात पुढे काँग्रेस, २ नंबरवर शरद पवारांची राष्ट्रवादी आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्याकडे पाहून मतदान झालं हे म्हणणं गैर आहे असंही शिरसाट यांनी म्हटलं आहे.