Maharashtra Vidhan Parishad Election Sanjay Raut: "धोका एकतर्फीच असतो का?"; संजय राऊतांचा पत्रकारांनाच उलट सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 10:06 AM2022-06-20T10:06:16+5:302022-06-20T10:07:34+5:30
पत्रकारांना उत्तर देताना संजय राऊत काहीसे संतापले...
Maharashtra Vidhan Parishad Election Sanjay Raut: "राज्यसभेत महाविकास आघाडीची पहिल्या पसंतीची मतं महाविकास आघाडीलाच मिळाली. पण काही लोकांनी लबाडी केल्याने गडबड झाली. विधान परिषद निवडणुकीत मविआ मधील आमदार एकजूट आहेत. ही एकजूट किती आहे ते संध्याकाळपर्यंत सर्वांना कळेल", असा विश्वास शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. यावेळी पत्रकारांकडून निवडणुकीसाठी उभे असलेल्या उमेदवारांना धोका आहे का असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर संजय राऊत यांनी पत्रकारांनाच उलट प्रश्न केल्याचे दिसून आले.
पत्रकारावर संतापले संजय राऊत
आजच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांना धोका नाही पण काँग्रेसच्या उमेदवाराला धोका असू शकतो का? असा सवाल पत्रकारांनी राऊत यांना विचारला. त्यावर उत्तर देताना राऊत म्हणाले, "महाविकास आघाडीतील तीनही पक्ष हातात हात घालून पुढे चाललेले आहेत. त्यामुळे धोका वगैरे शब्द आता वापरणं योग्य नाही. आणि आम्हाला धोका पण समोरच्यांना (विरोधकांना) धोका नाही असं असतं का? धोका काय एकतर्फी असतो का? तुम्ही कसला धोका म्हणताय?", अशा शब्दात काहीशी संतप्त प्रतिक्रिया संजय राऊतांनी पत्रकारांना उत्तर देताना दिली.
'मविआ'तील आमदारांना धमक्यांचे फोन?
"काँग्रेसचे नेते किंवा मविआतील इतर नेते जे सांगत आहेत त्यात तथ्य आहे. या निवडणुकीच्या आधी काही आमदारांना केंद्रीय तपास यंत्रणा किंवा इतर यंत्रणांच्या मार्फत त्रास देण्याचा प्रयत्न झाला. आमदार आपापल्या पक्षाच्या कँपमध्ये असतानाही त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात होता. धमक्यांचे निरोप त्यांना येत होते. तरीही महाराष्ट्रामध्ये आम्ही या सर्वांवर मात करू आणि महाराष्ट्र पुढे नेऊ. मविआचे सर्व उमेदवार निवडून येतील", अशी माहिती त्यांनी दिली.