'संजय राऊत वेडा माणूस, परिणाम भोगावे लागणार', संजय शिरसाटांची घणाघाती टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2023 04:34 PM2023-03-01T16:34:33+5:302023-03-01T16:43:02+5:30
'संजय राऊतांनीच शिवसेना संपवली, काँग्रेस राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली.'- संजय गायकवाड
मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस, आज संजय राऊतांच्या वक्तव्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. खासदार संजय राऊत यांनी विधीमंडळाचा उल्लेख चोरमंडळ, असा केल्याने सत्ताधाऱ्यांनी विधीमंडळात हा मुद्दा उपस्थित करत हक्कभंगाची मागणी केली आहे. यावरुन शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी राऊतांवर जोरदार टीका केली.
लोकमतशी बोलताना संजय शिरसाट म्हणतात की, 'संजय राऊत वेडा माणूस, त्याची जाणीव मला आहे. त्यामुळेच मी वारंवार त्यांच्या विरोधात बोलत असतो. पण, वेडेपणाची लिमिट क्रॉस करेल, हे वाटलं नव्हतं. 288 सदस्यांना त्यांनी चोर बोलले, त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागणार. ही लहान घटना नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली, त्या घटनेच्या आधारे हे विधीमंडळ स्थापन झाले आहे. राज्यातल्या 12 कोटी जनतेने निवडून दिलेल्या सदस्यांना त्यांनी चोर म्हटले आहे. यात आदित्य ठाकरेंचाही समावेश आहे.'
ते पुढे म्हणतात, 'त्यामुळेच सगळ्यांचा रोष त्याच्यावर आहे. सभागृहात एकही सदस्य त्यांच्या बाजूने बोलला नाही. आज तातडीने त्यांच्यावर एआयआर नोंदवला गेला पाहिजे होता आणि अटक झाली पाहिजे होती. आम्ही यासाठी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांनाही बोललो. त्यांनाही सांगितलं की, यांची पोलीस सुरक्षा काढून घ्या. पोलीस सुरक्षेत हा बडबड करतो आणि स्वतःला शिवसैनिक म्हणतो. हिम्मत असेल तर त्यांनी एकट्याने फिरुन दाखवावं,' असे आव्हान त्यांनी दिले.
'ज्या 41 सदस्यांच्या जोरावर हा राज्यसभेत गेला, त्यांनाच चोर म्हणतो. नितिम्मता असेल तर यांनी राजीनामा दिला पाहिजे. चोरांच्या मतावर राज्यसभेवर जाणे आणि त्यांनाच चोर म्हणणे योग्य नाही. दरवेळेस शिवसेनेला अडचणीत आणणारा माणूस सुपारीबद्दादर संजय राऊत आहे. संजय राऊतला तुरुंगात टाकणे ही आमची भूमिका असणार आहे,' अशी टीकाही शिरसाट यांनी केली.
संजय गायकवाड यांचीही टीका
'संजय राऊतांनी विधीमंडळातील आमदारांना चोर म्हटले, म्हणजे उद्धव ठाकरे आणि त्यांचे 14-16 आमदारही चोर झाले. ज्या महान लोकांनी राज्याला दिशा दिली, तेदेखील चोर झाले. त्यामुळेच आम्ही हक्कभंग प्रस्ताव दाखल केला. जोपर्यंत या मार्फत त्यांना शिक्षा होणार नाही, तोपर्यंत आम्ही कामकाज चालू देणार नाही. कारवाई झाली तर सहा महिने त्याला शिक्षा होईल. त्याचा कायमचा बंदोबस्त आम्ही काढतो.'
'संजय राऊतांनीच शिवसेना संपवली, मातीत घातली. संघटना राष्ट्रवादी काँग्रेसच्या दावणीला बांधली. त्यावेळेस सगळ्या आमदारांना समजून सांगितलं तर परत आले होते. पण, तेव्हा महिला आमदारांना वेष्या म्हणाला, यांची प्रेत वापस येतील अशी वक्तव्ये केली. त्यांनी कधीही उद्धव ठाकरे आणि आमदारांना एकत्र येऊ दिले नाही. तो मूळात शिवसेनाद्रोही आहे. तो बाळासाहेबांच्या विचाराचा सैनिक नाही,' अशी टीकाही गायकवाड यांनी केली.