“संजय राऊत खोटंच बोलणार, त्यांचा आवाज आता बसलाय;” अपहरणावरील वक्तव्यावरून नारायण राणेंचा निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 07:53 PM2022-06-21T19:53:59+5:302022-06-21T19:54:44+5:30
अडीच वर्षापूर्वी फसवणूक झाल्याचं ते कबुल करतात. वारंवार अपमानस्पद वागणूक एकनाथ शिंदे यांना देण्यात आली. यातून शिंदे यांचा स्वाभिमान जागा झाला. - नारायण राणे
राज्याच्या विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर मोठा राजकीय भूकंप झाला आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेसह राज्यातील राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे. पार्श्वभूमीवर वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर शिवसेना नेते संजय राऊत त्यांनी भाजपवर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. दोन आमदारांचे अपहरण करण्यात आली असून त्यांना मारहाण करण्यात आली असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. गुजरातमध्ये ऑपरेशन लॉट्सच्या गुंडांनी अपहरण केल्याचं राऊत यांनी गंभीर आरोप केला आहे. दरम्यान, यानंतर भाजपचे नेते आणि मंत्री नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.
“संजय राऊत खरं किती बोलणार, खोटंच बोलणार ते. आता आवाज बसलाय, खाली गेलाय. उद्यापर्यंत तो आवाज बंद होईल. ते काहीही बोलतात. काय किडनॅपस ते वावरताना दिसत आहेत आणि शिवसेनेला कोणीही घाबरत नाही,” असंही राणे म्हणाले.
“शिवसेना भवनाकडे प्रचंड गर्दी म्हणतात, ५० माणसंही नाही. वर्षावर ११ आमदार आहेत. मी तिकडच्या कर्मचाऱ्यांना मोजायला सांगितले. मी तिकडे प्रेमानं जोडलेला कर्मचारी वर्ग आहे. आमदारांशई माझं नातं आहे, संबंध आहेत. ते फक्त पदासांठी आणि पैशांसाठी नाही, त्यांच्याशी घरोबा आहे,” असंही ते म्हणाले.
‘वारंवार अपमानास्पद वागणूक’
नारायण राणे म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्या बंडाने महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं आहे. अडीच वर्षापूर्वी फसवणूक झाल्याचं ते कबुल करतात. वारंवार अपमानस्पद वागणूक एकनाथ शिंदे यांना देण्यात आली. यातून शिंदे यांचा स्वाभिमान जागा झाला. त्यातून त्यांनी बंड केले. बाळासाहेबांनी शिवसेना पक्ष वाढवला, शिवसैनिकांवर प्रेम केले. पण पक्षप्रमुख, मुख्यमंत्री असूनही सहकाऱ्यांना विश्वास देता आला नाही. शिवसैनिकांना भेटीगाठी दिल्या नाहीत. मातोश्रीच्या बाहेर पडायचं नाही. त्यामुळे गुदमरलेल्या मंत्री, आमदारांनी त्यागाच्या भूमिकेवरून केलेला हा बंड आहे असं त्यांनी सांगितले.