महाराष्ट्र निवडणूक 2019 : सत्तासंघर्षात फडणवीस-ठाकरेंपेक्षा संजय राऊतांची अधिक चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2019 11:04 AM2019-11-02T11:04:25+5:302019-11-02T11:24:17+5:30
Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : मातोश्रीचे 'चाणक्य' म्हणून ओळख असलेले संजय राऊत यांच्या शब्दाला शिवसेनेत आणि राजकरणात वजन आहे.
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप-शिवसेनेत सत्तासंघर्ष सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोन्ही नेते आपल्या मागण्यांवर ठाम असल्याने हा तिढा सुटत नसल्याचे दिसत आहे. मात्र भाजप-शिवसेनेत सुरु असलेल्या सत्तासंघर्षात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे या दोन्ही नेत्यांपेक्षा तेच अधिक चर्चेत आले असल्याचे दिसत आहे.
मातोश्रीचे 'चाणक्य' म्हणून ओळख असलेले संजय राऊत यांच्या शब्दाला शिवसेनेत आणि राजकरणात वजन आहे. शिवसेना जेव्हा-जेव्हा अडचणीत सापडली आहे, त्या-त्यावेळी सेनेला त्यातून बाहेर काढण्यासाठी राऊत यांची भूमिका महत्वाची ठरली आहे. सद्या भाजप-शिवसेनेत सुरु असलेल्या सत्तासंघर्षात सुद्धा राऊत आघडीवर आहेत. त्यांनी घेतलेली आक्रमक भूमिका पाहता भाजपवर एकप्रकारे दबाव निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. तर दोन्ही पक्षात सुरु असलेल्या कुस्तीच्या दंगलीत संजय राऊत उस्ताद ठरले आहे.
गेल्या पाच वर्षात सत्तेत सोबत असताना सुद्धा भाजप-शिवसेनेत नेहमीच वाद सुरु असल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र या काळात सुद्धा संजय राऊत यांच्या इतके भाजपला कुणीच डिवचले नसेल. त्यात आता सत्तेसाठी सुरु असलेल्या या दोन्ही पक्षाच्या संघर्षात शिवसेनेची भूमिका राऊत आक्रमकतेने माडंत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंपेक्षा सुद्धा संजय राऊत अधिक चर्चेत असल्याचे बोलले जात आहे.
निवडणुकीत युतीत जागा-वाटपाचा विषय असो की सत्तास्थापनेचा फॉर्म्युला, प्रत्येकवेळी संजय राऊत यांची भूमिका महत्वाची असते. तर विरोधी पक्षाच्या टीकेला खरखरीत उत्तर देण्यासाठी सुद्धा राऊत नेहमीच पुढे असतात. राज्यात सुरु असलेल्या भाजप-शिवसेनेच्या सत्तासंघर्षात राऊत यांच्या भूमिकेबद्दल सोशल मिडियात मोठ्याप्रमाणावर चर्चा सुरु आहे. त्यामुळे राऊत पुन्हा चर्चेत आले आहेत.