Sanjay Raut: ...यात राष्ट्रवादी काँग्रेस कमी पडतेय; संजय राऊतांनी केले भाजपच्या टाळीवरही भाष्य
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2023 11:25 AM2023-03-09T11:25:03+5:302023-03-09T11:25:43+5:30
फडणवीसांना माफ करा अशा मागण्या कोणी केलेल्या नाहीत. त्यांना माफ करायचं की नाही ते आम्ही ठरवू. - संजय राऊत
भाजपाला समेटाचा प्रस्ताव दिलेला नाही, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितलेले असताना संजय राऊतांनी देखील यावर भाष्य केले आहे. भाजपकडून हात जरी आला तरी अजिबात स्वीकारला जाणार नाही, असे राऊतांनी म्हटले आहे.
भाजपने नागालँडमध्ये सत्ता स्थापन केलेली नाही. नागालँड हे सीमावर्ती राज्य आहे, संवेदनशील राज्य आहे. रिओ पार्टीबरोबर भाजपची युती होती, त्यात भाजपला १०-१२ जागा मिळाल्या आहेत. सर्वांनी एकत्रित येत सरकार बनवलेय हे खरे आहे. असा प्रयोग तिथे आधी देखील झाला आहे कारण राज्याची ती गरज आहे, असे राऊत म्हणाले.
विकासाच्या दृष्टीनं पाऊल टाकता यावी त्यामुळे अशाप्रकारे निर्णय घेतले जातात, हे लोकांपर्यंत पोहोचविण्यात राष्ट्रवादी काँग्रेस कमी पडत आहे. काश्मीरपेक्षाही तिथली सुरक्षाविषयक परिस्थिती गंभीर आह. भाजप तिथल्या सरकारमध्ये सहभागी झालेय. महाविकास आघाडीची आज बैठक आहे, त्यावर चर्चेत नक्की हा विषय देखील येईल, असेही राऊत म्हणाले.
फडणवीसांना माफ करा अशा मागण्या कोणी केलेल्या नाहीत. त्यांना माफ करायचं की नाही ते आम्ही ठरवू. ज्यापद्धतीनं महाराष्ट्रातला एक प्रमुख पक्ष, जो राज्याच्या हितासाठी, हिंदुत्ववादी पक्ष, केंद्रीय यंत्रणा आणि पैशाचा वापर करत तोडला हा महाराष्ट्रावर केलेला आघात आहे. राज्याची जनताच आता ठरवेल त्यांना माफ करायचं की नाही. मात्र महाराष्ट्रातील जनता ही वेदना विसरणार नाही. तुम्ही माफीचं वाटप करायला बसला आहात का? महाराष्ट्राच्या काळजात घुसलेला हा घाव आहे. हा घाव शिवसेना कधीही विसरणार नाही. भाजपकडून हात जरी आला तरी अजिबात स्वीकारला जाणार नाही, अशा शब्दांत राऊतांनी भाजपा आणि फडणवीस यांना फटकारले आहे.
राजकारणात मतभेद होत असतात पण तुम्ही बाळासाहेबांनी निर्माण केलेला पक्ष फोडला, तोडला आणि चोर लफंग्यांच्या हातात ठेवला, कोण तुम्हाला माफ करेल? असा सवालही त्यांनी केला आहे.
मनसेचे सर्व शिवसेनेतच होते. शिवसेना आणि बाळासाहेब नसते तर आपण कुठे असतो याचं आत्मचिंतन या लोकांनी केलं पाहिजे. मुळ शिवसेना आपल्या जागेवरच आहे, भाजपनं ती विकली असली, नावाने केली असली तरी मूळ शिवसेना ती मूळ शिवसेना आहे, असे मनसेच्या वर्धापन दिनावर राऊतांनी प्रतिक्रिया दिली.