संजय राऊत 28 मे रोजी कोल्हापूर दौऱ्यावर; राजकीय घडामोडींना वेग
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 06:50 PM2022-05-24T18:50:50+5:302022-05-24T19:04:09+5:30
Sanjay Raut : संजय राऊत 28 मे रोजी कोल्हापूर दौऱ्यावर जाणार आहेत. याठिकाणी संजय राऊत यांची जाहीर सभा होणार आहे.
मुंबई : सध्या राज्यात राज्यसभेच्या सहाव्या जागेवरुन सुरु असलेल्या चर्चांना अखेर शिवसेनेने पूर्णविराम दिला आहे. सहाव्या जागेसाठी शिवसेनेने संभाजीराजे छत्रपतींना ऑफर दिली होती. परंतु संभाजीराजेंनी यावर काहीच प्रतिक्रिया न दिल्याने आता शिवसेनेने आपला उमेदवार निश्चित केला आहे. शिवसेनेने सहाव्या जागेसाठी कोल्हापुरातील शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार यांचे नाव शिक्कामोर्तब केले आहे. यासंदर्भात लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येईल, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. दरम्यान, संजय राऊतकोल्हापूर दौऱ्यावर जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
संजय राऊत 28 मे रोजी कोल्हापूर दौऱ्यावर जाणार आहेत. याठिकाणी संजय राऊत यांची जाहीर सभा होणार आहे. शिवसंपर्क अभियानाच्या निमित्ताने संजय राऊत कोल्हापुरात जाणार आहेत. संजय राऊतांचा कोल्हापूर दौरा चार दिवसांचा असणार आहे. याबाबतचे वृत्त मराठी वृत्तवाहिनी एबीपी माझाने दिले आहे. दरम्यान, राज्यसभेच्या सहाव्या जागेवरुन सुरु असलेल्या चर्चांना अखेर शिवसेनेने पूर्णविराम दिला आहे. शिवसेना छत्रपती संभाजीराजेंना उमेदवारी देणार की नाही, यावर तर्क-वितर्क लढवले जात असताना अखेर संजय पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय घडामोडी वेगाने सुरू असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, मंगळवारी संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शिवसेनेकडून राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संजय पवार यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. यासंदर्भात लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येईल, असे संजय राऊत यांनी सांगितले. संजय पवार हा शिवसेनेचा मावळा आहे. उद्धव ठाकरेंनी या मावळ्याला उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या तीस वर्षांपासून संजय पवार शिवसेनेत सक्रिय आहेत. राज्यसभेच्या दोन्ही जागा शिवसेनेच्या आहेत आणि त्या निवडून येतील, असे संजय राऊत म्हणाले.
कोण आहेत संजय पवार?
शिवसनेचे कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख असलेले संजय पवार हे गेल्या 30 वर्षांपासून शिवसेनेत सक्रिय आहेत. गेल्या 9 वर्षांपासून ते कोल्हापूर जिल्हाप्रमुख म्हणून सक्रिय आहेत. स्थानिक राजकारणावर त्यांची मजबूत पकड आहे. कोल्हापुरात पक्षबांधणीचे काम जोमाने केले. आण्णासाहेब पाटील महामंडळाचे ते उपाध्यक्ष आहेत. तसेच तीन वेळा कोल्हापूर महापालिकेत शिवसेनेचे नगरसेवक निवडून आले होते.