Sanjay Raut on Raj Thackeray: महाराष्ट्रात नवहिंदू ओवेसी, सेनेविरोधात लढविण्याचे काम; संजय राऊतांची राज ठाकरेंवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2022 09:16 PM2022-04-30T21:16:02+5:302022-04-30T21:24:27+5:30
महाराष्ट्र दिनानिमित्त उद्या 1 मे रोजी औरंगाबाद येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा होत आहे. डोंबिवलीत भाऊ चौधरी फाऊंडेशनतर्फे आयोजित मिसळ महोत्सवात राऊत पत्रकारांशी बोलत होते.
डोंबिवली: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काल बाबरी पाडली तेव्हा राज ठाकरे कुठे होते, असा सवाल करत हिंदुत्वाच्या मुद्द्यावर टीका केली होती. आज संजय राऊत यांनी राज ठाकरेंना नवहिंदू ओवेसी म्हणत उत्तर प्रदेशच्या निवडणुकीचा दाखला दिला.
भाजपाने एका ओवसीला उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक जिंकण्यासाठी वापरले. त्याप्रमाणे महाराष्ट्रातही नव हिंदू ओवेसीला शिवसेनेविरोधात लढवून हिंदूंचे नुकसान करण्याचे काम भाजप करत आहे, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नाव न घेता केली. डोंबिवलीत भाऊ चौधरी फाऊंडेशनतर्फे आयोजित मिसळ महोत्सवात ते पत्रकारांशी बोलत होते.
महाराष्ट्र दिनानिमित्त उद्या 1 मे रोजी औरंगाबाद येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा होत आहे. त्यावर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले की स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यानंतर लोकांना बाळासाहेब ठाकरे हेच हिंदू हृदयसम्राट म्हणून लोकांना माहिती आहेत. कोणी कितीही शाली पांघरल्या, नकला केल्या तरी शेवटी हिंदू हृदयसम्राट हे एकच असल्याचे खासदार संजय राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले.
महाराष्ट्र दिनी अनेकांना स्वाभिमानाचा झटका द्यावा लागणार...
ज्याप्रकारचे राजकारण सध्या सुरू आहे ती मात्र आपली संस्कृती नाही. महाराष्ट्रात यापूर्वीही सत्ताधारी आणि विरोधक, विविध विचारांचे लोक एकमेकांच्या भूमिकांना विरोध करत राहिले. बाळासाहेब ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर किंवा पवारांनी बाळासाहेबांवर वेळोवेळी टीका केली. परंतु महाराष्ट्राच्या स्थापनेपासून सुड, द्वेष आणि कमरेखाली वार करण्याचे राजकारण कधीच झाले नाही. भाजपने गेल्या 2 - 4 वर्षांत सुरू केलेले राजकरण महाराष्ट्र आणि देशाला परवडणारे नसल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. तर मिसळ ही महाराष्ट्राची खाद्य संस्कृती असून त्यात झटका आहे. उद्या महाराष्ट्र दिन असून स्वाभिमानाचा झटका अनेकांना द्यावा लागणार असल्याचा अप्रत्यक्ष इशाराही खासदार संजय राऊत यांनी यावेळी दिला.