Sanjay Raut Sharad Pawar Uddhav Thackeray: "संजय राऊत हे शरद पवार यांच्या 'पे रोल' वर आहेत, ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना घेऊन बुडणार"; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 05:55 PM2022-02-16T17:55:19+5:302022-02-16T18:01:59+5:30
उद्धव ठाकरेंबाबत १९ बंगल्यांचा विषय एक वर्षापूर्वी मांडण्यात आला. पण संजय राऊत स्वतः किंवा त्यांचे सीए किंवा त्यांच्या मुलींपर्यंत विषय येईपर्यंत गप्प बसले होते, असेही भाजपा प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
BJP vs Shivsena: शिवसेना खासदार Sanjay Raut यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटलं होतं की मोहित कंबोज हे विरोधी पक्षनेते Devendra Fadnavis यांनी बुडवतील. मोहित कंबोज हे देवेंद्र फडणवीस यांना बुडवतील का, याची काळजी संजय राऊत यांनी करू नये. पण एक मात्र नक्की, संजय राऊत हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष Sharad Pawar यांच्या पे रोलवर असून ते आता मुख्यमंत्री Uddhav Thackeray यांना घेऊन बुडणार हे मात्र स्पष्ट दिसत आहे, असा सणसणीत टोला भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला.
"संजय राऊत यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले की, मोहित कंबोज देवेंद्र फडणवीस यांना बुडवतील. तसं काही होणार नाही. देवेंद्र फडणवीस आणि आम्ही समर्थ आहोत. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 'पे रोल' वर राहून पवार साहेबांचा अजेंडा चालविणारे संजय राऊत हे अंतिमतः वाट लावणार आहेत व आपल्याला खड्ड्यात घालणार आहेत हे उद्धव ठाकरे यांच्या लक्षात आलेले दिसत नाही. अडीच वर्षांपूर्वी संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना युती तोडण्यासाठी भरीस घातले. भाजपासोबतची युती तोडून काँग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी केल्यानंतर शिवसेनेने मुस्लीम मतांच्या मागे लागून आपला मूळ पाया संपविला. यामुळे आपल्याला मानणारी जनता तसेच आपले जुने नेते-कार्यकर्ते सोबत राहणार नाहीत, हे उद्धव ठाकरेंच्या अजूनही का लक्षात येत नाही", असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
"उद्धव ठाकरे यांच्याबाबत १९ बंगल्यांचा विषय एक वर्षापूर्वी मांडण्यात आला. या काळात संजय राऊत त्या विषयी बोलले नाहीत. संजय राऊत स्वतः किंवा त्यांचे सीए किंवा त्यांच्या मुलींपर्यंत विषय येत नव्हता, तेव्हा त्यांच्यासाठी सर्व काही आलबेल होतं. आता त्यांच्या गळ्याशी विषय आल्यानंतर त्यांनी शिवसेना भवनमध्ये पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण शिवसेना वापरण्याचा प्रयत्न केला. मुंबईतील शिवसैनिकांची संख्या कमी पडली म्हणून नाशिक व पुण्यातून शिवसैनिकांना आणलं. ही पत्रकार परिषद शिवसेना आणि ठाकरे कुटुंबावरील हल्ले परतविण्यासाठी होती असं म्हणणं असेल तर आदित्य ठाकरे, सुभाष देसाई आणि एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे नेते त्यावेळी तेथे उपस्थित का नव्हते?", असा प्रश्नही चंद्रकांत पाटील यांनी विचारला.